Nashik 
नाशिक

Nashik-अंबडमधील चार कंपन्यांना 'क्लोजर'

Ambad companies closure MPCB- पाचवीवर कारवाई प्रस्तावित : पालकमंत्र्यांच्या भेटीनंतर 'एमपीसीबी' अॅक्शन मोडवर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणास कारणीभूत ठरत असलेल्या चार प्लेटिंग उद्योगांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 'क्लोजर' नोटीस बजाविली, तर पाचव्या कंपनीवर आदेश प्रस्तावित आहेत. या कंपन्यांमधील सांडपाणी प्रक्रिया यंत्र बंद असल्यामुळे प्रक्रिया न केलेले सांडपाणी कारखान्याबाहेरील नाल्यात जात असल्यामुळे परिसरातील नागरिकांना त्वचारोगांसह अन्य आजार जडत आहेत. दोन दिवसांपूर्वीच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी परिसरातील नागरिकांची भेट घेतली असता, त्यांनी तक्रारींचा पाढा वाचला होता. त्यानंतर 'एमपीसीबी' ने अॅक्शन मोडवर येत ही कारवाई केली.

मॅक्स सर्फेस ट्रीटमेंट प्रा. लि., एसेन मेटल ट्रीटर्स, श्री साई एंटरप्रायजेस आणि विजय इंडस्ट्रीज या चार कंपन्यांना बंदचे निर्देश देण्यात आले आहे, तर मायक्रॉन इंडस्ट्रीजविरोधात बंद आदेश देण्याची प्रक्रिया प्रस्तावित आहे. कंपनीची वीज आणि पाणीपुरवठा जोडणी आदेश प्राप्त झाल्यापासून २४ तासांच्या आत खंडित करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दोन दिवसांपूर्वी अंबड परिसराला भेट दिली असता, रहिवाशांनी त्यांच्यासमोर प्रदूषणामुळे होणाऱ्या त्रासाचा पाढा वाचला होता. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईकडे लक्ष वेधले गेले आहे.

मॅक्स सर्फेस ट्रीटमेंटवर ठपका

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गुरुवारी (दि. ८) मॅक्स सर्फेस ट्रीटमेंट प्रा. लि. या कंपनीला बंदचे निर्देश जारी केले. कंपनीच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची यंत्रणा कार्यरत नसणे, एप्रिल २०२६ पासून यांत्रिक बाष्प पुनर्सपीडक यंत्रणा बंद असल्याची नोंद आणि कारखान्याबाहेरील नाल्यात जाणाऱ्या निचरा वाहिनीत क्षारीय सांडपाणी आढळणे, अशा बाबी आदेशात नमूद करण्यात आल्या आहेत. बुधवारी (दि. ७) केलेल्या पाहणीत क्रोम प्लेटिंग टाकीतून गळती होत असल्याचेही मंडळाने नोंदविले आहे. प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा १०० टक्के पुनर्वापर करून शून्य द्रव विसर्ग साध्य करण्याच्या अटीचे पालन न झाल्याचा ठपका कंपनीवर ठेवण्यात आला आहे.

प्रदूषणावर नियंत्रण आणण्याचे आव्हान

अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योग आणि त्यालगतच्या नागरी वस्त्यांमधील अंतर, सांडपाण्याचे व्यवस्थापन आणि नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी या मुद्द्यांवर प्रशासनाला ठोस उपाययोजना कराव्या लागणार आहेत. संबंधित उद्योगांतील प्रदूषण नियंत्रण यंत्रणांची तपासणी, बंद आदेशांची अंमलबजावणी आणि परिसरातील पाणी व पर्यावरणाच्या स्थितीची पडताळणी महत्त्वाची ठरणार आहे

शून्य द्रव विसर्ग अटीचे उल्लंघन

कंपनीला प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा १०० टक्के पुनर्वापर करून शून्य द्रव विसर्ग (झेडएलडी) साध्य करण्याची अट घालण्यात आली होती. मात्र, सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा कार्यरत नसणे, निचरा वाहिनीत सांडपाणी आढळणे आणि प्लेटिंग टाकीतून गळती होणे या बाबी संबंधित अींचे पालन होत नसल्याचे दर्शवितात, असे मंडळाने आदेशात म्हटले आहे. कारणे दाखवा नोटीस देऊनही आवश्यक अनुपालन करण्यात आले नसल्याचा ठपका मंडळाने ठेवला आहे. प्रक्रिया न केलेले सांडपाणी जवळच्या नाल्यात सोडले जात असल्याने पर्यावरणाचे प्रदूषण होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT