जळगाव :
अमळनेर शहरात गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांनी नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र अखेर पोलिसांनी चोख गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे या दुचाकी चोरी रॅकेटचा भांडाफोड करत दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम डोंगराळ भागातून तब्बल २४ चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करून नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. या दुचाकींची एकूण किंमत सुमारे १५ लाख ६३ हजार रुपये इतकी आहे.
अमळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी चोरीच्या तक्रारी वाढत होत्या. त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वरी रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, आणि उपविभागीय अधिकारी विनायकराव कोते यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची सूत्रं पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी हातात घेतली.
गुन्हे शोध पथकातील पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक साधनांच्या मदतीने संशयितांचा माग काढला. त्यातून दोन संशयित हिंमत रेंहज्या पावरा आणि अंबालाल भुरट्या खरर्डे (दोघेही रा. सातपिंप्री, ता. शहादा, जि. नंदुरबार) यांच्यावर पोलिसांचा संशय गेला. तपास पथकाने नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव परिसरातील घनदाट जंगल आणि डोंगरदऱ्यात मोठी शोधमोहीम राबवून या दोघांना पकडलं.
चौकशीत आरोपींनी अमळनेरसह विविध ठिकाणांहून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यांनी या मोटारसायकली सातपिंप्री गावाजवळील जंगलात लपवून ठेवल्या असल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. त्या ठिकाणाहून पोलिसांनी २४ दुचाकी जप्त केल्या.
या कारवाईसाठी अप्पर पोलीस अधीक्षकांच्या परवानगीने आणि पोलीस निरीक्षकांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाने अत्यंत काळजीपूर्वक योजना आखली होती. या पथकात पोउपनि शरद काकळीज, पोकॉ प्रशांत पाटील, गणेश पाटील, उज्वलकुमार म्हसके, नितीन मनोरे, उज्वल पाटील, आणि हितेश बेहरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
दोन्ही आरोपींवर अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोहेकॉ काशिनाथ पाटील आणि पोकॉ सागर साळुंखे करत आहेत. या यशस्वी कारवाईमुळे आंतरजिल्हा वाहनचोर टोळीचा मोठा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.