सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा नाशिक-सिन्नर-संगमनेर-आळेफाटा-नारायणगाव-मंचर-राजगुरुन गर-चाकण-पुणे हा मूळ मार्ग कायम ठेवण्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकमताची भूमिका घेतली आहे. मुंबई येथील विधानभवनात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत या मार्गाच्या तांत्रिक, सामाजिक व विकासात्मक पैलूंवर सविस्तर चर्चा झाली.
मात्र, या बैठकीत अंतिम निर्णय होऊ शकला नसून, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत याबाबत निर्णय अपेक्षित आहे. बैठकीत आमदार बाबाजी काळे यांनी उत्तर पुणे जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक तसेच भविष्यातील प्रादेशिक विकासाच्या दृष्टीने मूळ मार्गात कोणताही बदल होऊ नये,
अशी ठाम भूमिका मांडली. चाकण औद्योगिक परिसरासह राजगुरूनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा आणि सिन्नर या भागातील वाहतूक सुविधा, औद्योगिक वाढ, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाशी संबंधित तांत्रिक बार्बीचे सादरीकरण केले. त्यावर सविस्तर चर्चा झाली.
मात्र, अंतिम निर्णय न झाल्याने मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक बोलाविण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री यांच्यासमवेत सर्व संबंधित आमदारांचे शिष्टमंडळ लवकरच नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन मूळ मार्ग कायम ठेवण्याची भूमिका मांडणार असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
बैठकीस मंत्री तथा आमदार दिलीप वळसे-पाटील (व्हर्चुअल माध्यमातून), माजी मंत्री तथा आमदान माणिकराव कोकाटे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार शरद सोनवणे, आमदार विठ्ठलराव लंघ पाटील, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार सत्यजित तांबे आमदार अमोल खताळ आणि आमदार अक्षय कर्डिले आदींसह अधिकारी उपस्थित होते.
गरज पडल्यास ९ ऑगस्टला आंदोलन; सिन्नर कृती समितीचा इशारा
सिन्नर तालुका कृती समितीने बैठकीतील सर्वपक्षीय एकमताचे स्वागत करत राज्य शासनाने जनभावना, शेतकरी, विद्यार्थी, उद्योग क्षेत्र आणि प्रादेशिक विकासाचा विचार करून मूळ मार्ग कायम ठेवण्याचा अंतिम निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच,
मुख्यमंत्री यांच्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्यास ९ ऑगस्ट रोजी जाहीर केलेले आंदोलन स्थगित करण्याची तयारी असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. मात्र, अपेक्षित निर्णय न झाल्यास क्रांतिदिनी नाशिक-पुणे महामार्ग आणि समृद्धी महामार्गावर चक्काजाम व रस्ता रोको आंदोलन तीव्र स्वरूपात करण्यात येईल, असा इशाराही समितीने दिला आहे.