Dam Water Level  pudhari photo
नाशिक

Nashik Dam Water Level | नाशिक जिल्ह्यातील 26 धरणांचे दरवाजे बंद! नदीपात्रातील विसर्गाला अखेर पूर्णविराम

Nashik Dam Water Level | पावसाने विश्रांती घेतल्यामुळे सात मोठ्या, १९ मध्यम प्रकल्पांतील विसर्गाला पूर्णविराम

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे आणि पाणीसाठा समाधानकारक स्थितीत असल्यामुळे जलसंपदा विभागाने जिल्ह्यातील २६ मोठ्या, मध्यम व लघु धरणांचे दरवाजे बंद केले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विसर्गाला अखेर पूर्णविराम मिळाला असून, आता केवळ पिण्याच्या व शेतीच्या गरजेनुसारच पाणी सोडले जाणार आहे.

जिल्हा प्रशासनाकडून सोमवारी (दि. ५) प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील गोदावरी खोऱ्यातील गंगापूर धरणात ९९ टक्क्यांहून अधिक साठा असून, सर्व दरवाजे बंद करण्यात आले आहेत.

त्याचप्रमाणे कश्यपी, गौतमी-गोदावरी, आळंदी धरणांमध्येही समाधानकारक साठा असल्यामुळे विसर्ग थांबवण्यात आला, तर दारणा - वाघाड समूहातील दारणा, मुकणे, वालदेवी, वाघाड, कडवा, पालखेड या धरणांतील पाण्याची पातळी स्थिरावली असून, कोणत्याही धरणातून सध्या नदीपात्रात विसर्ग सुरू नाही.

गिरणा खोऱ्यातही चणकापूर, हरणबारी, केळझर, पुनद ही धरणे ९५ टक्क्यांहून अधिक भरलेली असून, या खोऱ्यातीलही दारे बंद करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे करंजवण धरणातून होणारा विसर्गही थांबवण्यात आला आहे.

अत्यल्प पाऊस, दुष्काळाचे संकट:

पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा अतिशय कमी प्रमाणात पाऊस पडला असून, जिल्ह्यातील १० तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. यात नाशिक व चांदवड तालुक्यांचा समावेश करण्यात येण्याची शक्यता असून, उर्वरित त्र्यंबकेश्वर, दिंडोरी व निफाड तालुक्याविषयीही फेरविचार होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे संपूर्ण जिल्हाच दुष्काळाच्या छायेत असून, आगामी काळात नाशिक जिल्ह्यासह जिल्ह्यातील धरणांच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या अन्य जिल्ह्यांच्या पाण्याचेही नियोजन करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असून, पावसाचा जोर ओसरल्यामुळे जलसंपदा विभागाने धरणांमधील विसर्ग थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.

दुष्काळी परिस्थितीत, नागासाक्या धरण कोरडेच:

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेले पांझण नदीवरील नागासाक्या धरण हे दुष्काळी परिस्थितीमुळे पूर्णपणे कोरडेठाक पडले आहे. महाराष्ट्रात काही भागांत पाऊस झाला, तरी नागासाक्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे या धरणात सध्या 'शून्य टक्के' उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.

या धरणाचे पाणलोट क्षेत्र केवळ २ ते ३ किलोमीटरचे असून, ते प्रामुख्याने मनमाड आणि नांदगाव परिसरातील पावसावर अवलंबून असते. या भागात सातत्याने कमी पाऊस होत असल्यामुळे धरणात पाणी आलेले नाही. त्यामुळे नांदगाव आणि मालेगाव तालुक्यातील सुमारे दोन हजार हेक्टर सिंचन क्षेत्रही कोरडे पडले आहे.

जिल्ह्यात ६०.६०३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा:

नाशिक जिल्ह्यातील सात मोठ्या व १९ मध्यम प्रकल्प अशा सर्व २६ धरणांमध्ये मध्ये ७०.६१९ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता आहे. यापैकी सध्या ६०.६०३ टीएमसी म्हणजे ९७.१४ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असली, तरी पावसाने विश्रांती घेतल्याने रब्बी हंगामावर संकट निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT