Simhastha Kumbh Mela Nashik Pudhari News Network
नाशिक

Nashik Simhastha Kumbh Mela | 'आखाड्यांना त्यांच्या पारंपरिक जागा तातडीने द्याव्या'

Nashik Simhastha Kumbh Mela | 'आखाड्यांना त्यांच्या पारंपरिक जागा तातडीने द्याव्या'; सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या बैठकीत साधू-महंतांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध आखाड्यांच्या साधू-महंतांनी कुंभमेळा प्रशासनाकडे साधुग्राम आणि कुंभग्रामसाठी जागा उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केल्याची माहिती राष्ट्रीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते संजयदास महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयातील सभागृहात सोमवारी (दि. २०) कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री आणि पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली.

या बैठकीनंतर निर्मोही आखाड्याचे महंत तथा राष्ट्रीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते संजयदास महाराज यांनी पत्रकार परिषद घेत कुंभमेळा प्राधिकरणाच्या बैठकीत निर्वाणी, निर्मोही आणि दिगंबर आखाड्यांच्या महंतांनी आपल्या पारंपरिक जागा लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात, तसेच या जागांवर अतिक्रमाणे असल्यास ती तातडीने हटवून आखाड्यांना जागा ताब्यात देण्यात यावीत, अशी आग्रही मागणी करण्यात आल्याचे सांगितले.

यावेळी राष्ट्रीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते संजयदास महाराज यांच्यासह महंत मोहनदास महाराज (खाकी आखाडा), रामजीदास महाराज (निर्मोही आखाडा, चित्रकूट), महंत राजेंद्रदास महाराज (महामंत्री, आखाडा परिषद), मुलीदास महाराज (निर्वाणी आणि आखाडा), भक्तीचरणदास महाराज (पंचवटी, नाशिक), हेमंतदास महाराज (हनुमान गढी, अयोध्या) आदी उपस्थित होते.

ध्वजारोहणासाठी पंतप्रधानांना आमंत्रण देणार

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण ३१ ऑक्टोबर रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती साधू-महंतांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याचप्रमाणे साधू-महंतांच्या मागणीनुसार पारंपरिक जागा उपलब्ध झाल्यास आखाड्यांचे निवास आणि धार्मिक कार्यक्रम सुव्यवस्थितपणे पार पडतील, असा विश्वास साधू-महंतांनी व्यक्त केला.

प्राधिकरणासोबत बंद दाराआड चर्चा

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर आयोजित कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रशासनाने साधू-महंतांसोबत बंद दाराआड चर्चा केली. यावेळी साधू-महंतांनी साधुग्राम उभारणी व साधू-महंतांच्या सुरक्षेविषयी प्रशासनाकडून काय तयारी सुरू आहे? याविषयी माहिती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT