त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा
बडा उदासीन आखाड्याच्या पंचांनी हद्दपारीची घोषणा केलेली घोषणा चुकीची असून, हे पंचमंडळच स्वयंघोषित असल्याचे आणि आखाड्यात तसा नियम नसल्याचा दावा महंत रघुमुनी महाराज यांनी केला आहे तसेच न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचा दावा प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
महंत रघुमुनी महाराज यांनी केलेल्या दाव्यानुसार दि. ९ जुलै २०२६ रोजी कांचीपूरम येथे बडा उदासीन आखाड्याची झालेली बैठक बेकायदेशीर असून, येथे महंत दुर्गादास यांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून हुकूमशाही पद्धतीने प्रमुख महांतांची निवड केली आहे.
याबाबत न्यायालयात याचिकादेखील दाखल केल्याचा हवाला त्यांनी दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आखाड्यातील आश्रमांच्या सर्व व्यवहारांवर बंदी घातली असून, जीवनावश्यक खर्च वगळता इतर सर्व खर्चावर बंदी असल्यामुळे नैराश्यातून दुर्गादास महाराज असे करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
गत महिन्यात हरिद्वार येथे महानिर्वाणी आखाड्याचे श्रीमहंत रवींद्र पुरी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत १३ पैकी ८ आखाडे सोबत असल्याचे आणि अध्यक्ष महानिर्वाणीचे रवींद्र पुरी असल्याचे जाहीर करण्यात आले होते.
त्याला प्रतिवाद करण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे तातडीने बैठक घेऊन बडा उदासीन आखाड्याचे श्रीमहंत रघुमुनी महाराज यांच्यावर असलेले आरोप न्यायालयाने फेटाळले असल्याचे जाहीर करीत त्यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले होते. मात्र, आता या आरोपांमुळे अ. भा. आखाडा परिषदेच्या दोन गटांत असलेला वाद विकोपाला जाण्याचे चिन्हे आहेत.
आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या वादात दोन्ही गट बडा उदासीन आखाडा आपल्यासोबत असल्याचा दावा करीत आहेत. त्यामध्ये महंत रघुमुनी यांचा विषय चर्चेत आला आहे. दरम्यान, या सुंदोपसुंदीचे पडसाद त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यात उमटतील अशी शक्यता आहे.
तथाकथित बैठकीवर सर्व मंडळातील साधूंनी बहिष्कार टाकला होता. उच्च न्यायालयाने कार्यकारिणी रद्द केली आहे. त्यांना कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नाही. न्यायालयाच्या आदेशाचा आणि आखाड्याच्या नियमांचा अवमान करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.श्री महंत रघुमुनी महाराज, श्री पंचायती बडा उदासीन आखाडा