नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दिवाळीनिमित्त घरारांत प्रकाशाची उधळण करणाऱ्या आकाशकंदिलांवर यंदा सिंहस्थ कुंभमेळ्याची छाप उमटलेली दिसत आहे. प्रभू श्रीराम, सिंहस्थ कुंभमेळ्याचे बोधचिन्ह, साधू-महंतांच्या प्रतिमा, गोदावरी प्रवाह आणि अमृतकुंभ अशा धार्मिक व सांस्कृतिक प्रतीकांनी सजलेले आकाशकंदील बाजारात दाखल झाले आहेत.
नाशिक - त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या संकल्पनेतील आकाशकंदिलांना ग्राहकांकडून विशेष पसंती मिळत असल्याचे विक्रेते सांगत आहेत.
दिवाळीच्या पारंपरिक सजावटीत आकाशकंदिलांना विशेष महत्त्व असते. दरवर्षी वेगवेगळ्या रंगसंगती, आकार आणि आकर्षक रचनांमधील आकाशकंदील बाजारात येतात.
यंदा मात्र सिंहस्थ कुंभमेळ्याचे वेगळेपण आकाशकंदिलांच्या माध्यमातून घराघरारांत पोहोचताना दिसत आहे. कुंभमेळ्याचे बोधचिन्ह, साधू-महंतांच्या प्रतिमा आणि गोदावरीच्या प्रवाहाची कलात्मक मांडणी असलेल्या आकाशकंदिलांमुळे धार्मिक वातावरणाइतकाच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची आठवणही दिवाळीच्या सजावटीतून जपली जात आहे.
रंगेबेरंगी आणि विविध आकारांतील आकाशकंदील बाजारात उपलब्ध असून, पारंपरिक आकाशकंदिलांसोबतच कुंभमेळ्याची संकल्पना असलेल्या कंदिलांकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याची धार्मिक-सांस्कृतिक ओळख आणि दिवाळीच्या प्रकाशपर्वाची परंपरा यांचा संगम यंदा आकाशकंदिलांतून पाहायला मिळत आहे. त्यामुळे बाजारात पारंपरिक सजावटीबरोबरच कुंभमेळ्याच्या संकल्पनेतील आकाशकंदील लक्ष वेधून घेत आहेत.
एकीकडे कुंभमेळ्याच्या संकल्पनेतील आकाशकंदिलांना पसंती मिळत असताना, दुसरीकडे त्यांच्या किमती वाढल्यामुळे विक्रेत्यांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. आकाशकंदील तयार करण्यासाठी लागणाऱ्या पीव्हीसी, कडकपुठ्ठा, धागा, लेसेस, डुप्लेक्स आदि साहित्यांच्या किमतीत गतवर्ष्याच्या तुलनेत सुमारे ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
परिणामी, आकाशकंदिलांच्या विक्रिच्या किमतीही वाढल्या आहेत. यंदा दुष्काळी परिस्थितीचा परिणाम दिवाळीच्या खरेदीवर होत असल्याचे विक्रेत्यांचे निरीक्षण आहे. विशेषतः: ग्रामीण भागातील ग्राहकांकडून मागील वर्ष्याच्या तुलनेत कमी किमतीतील आकाशकंदिलांना पसंती दिली जात आहे.
आकाशकंदील तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमती वाढल्याने गतवर्ष्याच्या तुलनेत यंदा आकाशकंदिलांच्या किमती वाढल्या स्पष्टपणे जाणवत आहे. नाशिक - त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार असल्याने आकाशकंदिलांवर साकारलेली कुंभमेळ्याची संकल्पना ग्राहकांना आकर्षित करीत आहे.— हेमंत कोरडे, आकाशकंदील विक्रेता