नाशिक : निल कुलकर्णी
सुपिक जमिन, उत्तम जलसिचंन सोई, आल्हाददाय हवामान, निसर्गसौंदर्याचा वरदहस्त आणि पर्यटनासाठी आवश्यक वैविध्य यामुळे नाशिकमध्ये कृषी पर्यटनातून अर्थकारणाला सुगीचे दिवस येत आहेत. शेतीला जोडव्यवसाय म्हणून जिल्ह्यात अनेक स्थळांवर कृषी पर्यटनासाठी व्यापक वाव असल्याचे मत पर्यटक अभ्यासकांनी व्यक्त केले.
१६ मे हा जागतिक कृषी पर्यटन दिन म्हणून साजरा होतो. 'सर्वसमावेश वाढीसाठी कृषीपर्यटन' ही यंदाची संकल्पना आहे. राज्यात सर्वाधिक धरणांचा जिल्हा, काळी कसदार सुपिक जमिन, डोंगरदऱ्यांच्या कुशीतील अत्यंत आल्हाददायी हवामान यामुळे नाशिकमध्ये गेल्या २० वर्षांत कृषी पर्यटन केंद्रांची संख्या झपाट्याने वाढली. नवीन पिढीतील मुलांना ग्रामीण जीवन, शेती व्यवसायासंबंधी जीवनाची माहिती, अनुभव नसतो. त्यामुळे मुंबई, पुुणे ठाणे अशा जिल्ह्यातील लोक कृषी पर्यटनालाच पसंती देत आहेत. अस्सल गावराण जेवन, रानमेवा, कधी द्राक्षे, आंबा तर कधी मधुमक्षिका पालनाविषयची प्रत्यक्ष माहिती यामुळे जिल्ह्यातील कृषी पर्यटन केंद्रांना बहर येत आहे. पर्यटनासाठी पैसा खर्च तयार करण्याची मानसिकता वाढत असल्याने पर्यटक सढळ हाताने पर्यटन केंद्रावर खर्च करत आहे.
नवीन पर्यटन धोरणानुसार राज्याच्या पर्यटन संचालनालयाकडून कृषी पर्यटनासाठी विविध सवलती, प्रोत्साहन देणाऱ्या योजना आहेत. जीएसटी सूट, वीज बिलात सवलती असेही शासन लाभ त्यांना दिले जातात. नाशिकची सुपिकता, विपूल पाणी आणि आल्हाददायक हवामान यामुळे कृषी पर्यटन बहरत असले तरी अधिकाधिक शेतकऱ्यांनी यासाठी पूढे यावे.मधुमती सरदेसाई-राठोड, उपसंचालक, एमटीडीसी नाशिक कार्यालय.
कृषी जीवनापासून दूर गेलेले मुंबई पुण्यासह महानगरातील पर्यटकांसाठी कृषी पर्यटन हे अनुभूतीवर आधारित आगळा वेगळा आनंद देते. त्यामुळे कृषीपर्यटन केंद्राला मोठा प्रतिसाद लाभत आहे. त्यातून युवा वर्गाला मोठ्या रोजगार संधी, शेतकऱ्यांना जोडधंदा मिळण्यासह अर्थचक्र गतीमान होत आहे.जगदीश चव्हाण, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी नाशिक.
नाशिक - ४७
आहिल्या नगर - १८
जळगाव - ५
धुळे - ३
एकूण - ७४
कृषी पर्यटन शेतकऱ्यांसाठी उत्तम जोडव्यवसाय म्हणून उदयास येऊ शकतो. मात्र, येथील शेतकऱ्यांनी त्यासाठी आळस झटकून राज्य शासनाच्या आई पर्यटन योजनांचा लाभ घेऊन नांदूरमधमेश्वर, ममदापूर, बिलकस, बाऱ्हे भिवतास आदी ठिकाणांवर पर्यटन निवास केंद्रे सुरू करावीत. कृषीसह अभिनव संकल्पनावर पर्यटन केंद्र निर्माण करणाऱ्यांसाठी मोठा वाव आहे. हंगामात पर्यटनातून व अन्य 'स्लॅक' काळात केंद्र कौटुंबिक, सामाजिक कार्यासाठी सभागृह भाड्यानेही देता येतात.दत्ता भालेराव, पर्यटन अभ्यासक. नाशिक.