नाशिक : मंत्रिपद मिळाल्यापासूनच वादाची किनार लाभलेले कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांचा थेट विधिमंडळामध्येच मोबाइलवर जंगली रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी ट्विट केल्यानंतर मंत्री कोकाटे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंत्री कोकाटे यांनी अजब उत्तर दिले आहे. मी कोणताही गेम खेळत नव्हतो, मी काही पाप केले नसल्याचे मंत्री कोकाटे यांनी म्हटले आहे.
मंत्री कोकाटे यांनी रविवारी (दि. 20) येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी वरिष्ठ सभागृहात बसलो होतो, त्यावेळी कनिष्ठ सभागृहात काय चाललेय पाहण्यासाठी यूट्यूब प्ले करत असताना जाहिरात आली, ती स्किप करताना दोन- तीन सेकंद लागले. तुम्हाला तशी जंगली रमी जाहिरात येत नाही का? असा उलट सवालही त्यांनी माध्यमांना केला. तसेच वरच्या सभागृहात कामकाज तहकूब झाल्याने मी तिथे बसलो होतो. खालच्या सभागृहात काय सुरू आहे, हे पाहण्यासाठी मोबाइल ओपन केला होता. यूट्यूबवर जात असताना अनेक प्रकारच्या जाहिराती समोर येतात. त्या जाहिराती स्किप कराव्या लागतात. त्या जाहिराती स्किप करताना दोन- तीन सेकंद लागले. त्यांनी 18 सेकंदांचाच व्हिडिओ दाखवला पुढचा दाखविला नाही असेही म्हटले आहे.
विरोधक कधी माझ्या कपड्यावर बोलत आहेत, कधी मोबाइलवर, तर कधी गाडीवर बोलतात. पण माझ्या धोरणावर, माझ्या कामावर आणि मी शेतकऱ्यांसाठी केलेल्या उपाययोजनांवर कुठलाही विरोधी पक्ष नेता बोलत नाही. माझे काम पारदर्शी आहे. माझा स्वभाव स्पष्ट आहे. कुठल्या प्रकारे सभागृहात बसू नये, असे नियम मला माहिती आहेत असे त्यांनी सांगितले. तसेच आम्हाला शेतकऱ्यांची काळजी आहे म्हणून आम्ही दौरे करत आहोत. मात्र, आम्हाला बदनाम करण्याचा हा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. रोहित पवारांच्या मोबाइलमध्येही अशा जाहिराती येतात. मात्र ते स्वतःची करमणूक करून घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री कोकाटे म्हणाले की, आतापर्यंत रोहित पवारांचे माझ्या संदर्भात काय प्रश्न आहे? शेतकऱ्यांसंदर्भात काय प्रश्न आहेत काय? शेतकऱ्यांची काळजी त्यांनाच आहे का? आम्हाला नाही का? आम्ही शेतकऱ्यांसाठी गावोगाव फिरतो, विभागात जातो, बैठका घेतो, नवीन धोरण तयार करतो, हे त्यांना दिसत नाही. मात्र, रिकामे उद्योग कसे दिसतात? स्वतःची करमणूक करण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न असून, जनता अशा प्रकाराला बळी पडणार नाही, अशी टीकाही त्यांनी रोहित पवार यांच्यावर केली.