कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांचे पद धोक्यात
सोमवारी (दि.28) मंत्री कोकाटेंच्या मंत्रीपदाचा फैसला होण्याची शक्यता
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार शिरीष कोतवाल यांची घेतली होती भेट
नाशिक : वादग्रस्त वक्त्यव्यांमुळे चर्चेत राहिलेले राज्याचे कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मौन सोडले असून, प्रसार माध्यमांतून कोकाटेंना सुनावत मुख्यंत्र्यासोबत बसून सोमवारी निर्णय घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे सोमवारी (दि.28) मंत्री कोकाटेंच्या मंत्रीपदाचा फैसला होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर मंत्री ॲड.कोकाटे गुरुवारी (ता.२४) नियोजीत दौऱ्यानुसार प्रसार माध्यमांना टाळत ते धुळे जिल्हयाकडे रवाना झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसने कोकाटे यांच्यावर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्हयाच्या संपर्कप्रमुखांची जबाबदारी सोपविली आहे. याचाच भाग म्हणून, मंत्री कोकाटे यांच्या उपस्थितीत पक्षाचा मेळावा शुक्रवारी (दि.25) आयोजीत केला आहे. या मेळाव्यासाठी कोकाटे गुरूवारी (दि.24) नियोजित वेळ टाळून उशीराने धुळ्याकडे रवाना झाले. धुळयाकडे जात असताना मंत्री कोकाटे यांनी चांदवडमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार शिरीष कोतवाल यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. मंत्री कोकाटे-कोतवाल यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.