नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उद्योगपतींचे कोट्यवधींचे कर्ज माफ करायला या सरकारकडे वेळ आहे. पण आदिवासी समाज आणि रोजगारासाठी भटकणाऱ्या तरुणांचे प्रश्न सोडवायला यांच्याकडे वेळ नाही. या निर्दयी सरकारला हृदय उरलेले नाही. युवकांनी फक्त उपोषण सोडावे, या निर्दयी सरकारविरोधात आपण महाविकास आघाडीची वज्रमूठ उभारून देशातील सर्वात मोठे आदिवासी आंदोलन नाशिकमध्ये उभे करू, असे सांगत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी, आदिवासींच्या सुरू असलेल्या 'जेन झी' च्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पाठोपाठ गुरुवारी (दि. ३) आदित्य ठाकरे यांनी १२ दिवसांपासून उपोषण करीत असलेल्या युवकांची ईदगाह मैदानावर भेट घेत संवाद साधला. उपोषणकर्त्या युवकांच्या मागण्या व प्रश्न जाणून घेतले.
आदिवासी वसतिगृहातील असुविधा, सेंट्रल किचन रद्द करणे, डोनेशनच्या नावाखाली आदिवासी विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक लूट, दोन वर्षांत वसतिगृहातील ५९० विद्यार्थ्यांच्या मृत्यूबाबत मंत्री प्रा. अशोक उईके यांचा राजीनामा घ्यावा, या विभागाचे सचिव विजय वाघमारे व आयुक्त लीना बनसोड यांना तातडीने हटविण्याची मागणी आंदोलकांनी केली.
त्यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले की, जेन-झी म्हणजे फक्त भाषा आणि डान्स शिकणारी पिढी वाटली होती, पण आज याच तरुण पिढीने सरकारला योग्य धडा शिकवला आहे. मात्र, या सरकारला उपोषणाने फरक पडत नाही.
नॉनव्हेज खाल्ले की, या सरकारला त्रास होतो. पण लोक उपाशी राहिल्याने यांना काहीच वाटत नाही. तुमची ही अवस्था आता बघवत नाही. त्यामुळे इथून हटू नका पण उपोषण मागे घ्या, अशी विनंती त्यांनी उपोषणकर्त्यांना केली. 'जल, जंगल आणि जमिनीवर आदिवासींचा नैसर्गिक अधिकार आहे. या व्यतिरिक्त आपल्या मागण्या तरी काय आहेत.
मुख्यमंत्र्यांना त्यांच्या पीएच्या साखर कारखान्याला देण्यासाठी १८ कोटी रुपये आहेत. परंतु, पेगलवाडीसारख्या छोट्या गावातील रस्त्यासाठी १८ लाख रुपये देत नाही. या निर्दयी सरकारविरोधात उपोषण करत आपला जीव धोक्यात घालण्याची गरज नाही. आंदोलनाचा लढा अधिक तीव्र करण्याची गरज आहे. यासाठी उबाठा शिवसेना पूर्ण ताकदीने आपल्या पाठीशी राहील. राहुल गांधी यांनीही आपली भेट घेतल्यामुळे काँग्रेस आपल्यासोबत आहे.
भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी बोलून आपण महाविकास आघाडीची ताकद उभी करू. तुम्ही उपोषण मागे घेऊन आंदोलनावर ठाम राहा. आपण या सरकारविरोधात सर्वात मोठा लढा उभा करू, असे आश्वासन त्यांनी आंदोलकांना दिले.
आदित्य ठाकरे यांच्या भेटीनंतर राहुल पावरा याची तब्येत अचानक खालावल्यामुळे त्याला तातडीने रुग्णवाहिकेत उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान आदित्य ठाकरे यांनी रुग्णवाहिकेत जाऊन राहुल पावरा यांची भेट घेत त्याच्या प्रकृतीची चौकशी केली.
महाविकास आघाडीने आमच्या या लढ्याला पाठिंबा दिल्यास आम्ही उपोषण मागे घेत आंदोलन अधिक आक्रमक करू. संबंधित मंत्र्यांनी तातडीने राजीनामा दिला नाही, तर राजभवनावर धडक मोर्चा काढू, असा इशारा प्रशांत गावडे यांनी दिला. या आंदोलनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी महाविकास आघाडीला केले आहे.