नाशिक : ज्यांनी भाजपसाठी २५ ते ३० वर्षे काम केले. मेहनत घेऊन पक्षाला वैभव प्राप्त करून दिले. त्या भाजप कार्यकर्त्यांविषयी वाइट वाटते. कारण जे आता आयात केले. तेच भ्रष्टाचारी निष्ठावान कार्यकर्त्यांच्या डोक्यावर बसवले जाणार आहेत, अशा शब्दात भाजपकडून केल्या जात असलेल्या पक्ष प्रवेशावरून युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी घणाघात केला.
तपोवन भेटीप्रसंगी माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. भाजप तसेच संघाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी घरदार सोडून पक्षासाठी काम केले. सत्तेच्या जवळ आल्यानंतर त्यांना आता भ्रष्ट लोकांसाठी काम करावे लागणार असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले. ज्यांच्याकडे ईडी, सीबीआय आहे, त्यांच्याकडेच ही मंडळी जात आहे
आमच्याकडे वॉशिंग मशिन नाही. त्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांना आम्ही बाहेरचा रस्ता दाखवणार असल्याचेही त्यांनी सागितले. मुंबई महापालिका निवडणूक प्रचारात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येणार असल्याबाबत विचारले असता ठाकरे म्हणाले की कोविड काळात उत्तर प्रदेशमध्ये शव रस्त्यावर जाळली जात होती. अशात ते मुंबई मॉडेलची तुलना उत्तर प्रदेशच्या मॉडेलशी करणार काय, मुंबईच्या तुलनेत एक तरी शहर ते उत्तर प्रदेशात वसवू शकले काय, असे एक तरी उदाहरण त्यांनी प्रचारात सांगावे, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.