आमदार खोसकरांवर कारवाई अटळ, 'या' नेत्याने दिली मोठी माहिती  file photo
नाशिक

MLA Hiraman Khoskar | आमदार खोसकरांवर कारवाई अटळ, 'या' नेत्याने दिली मोठी माहिती

विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : विधान परिषद निवडणुकीत ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केले, त्यांच्यावर कारवाई होणार असून, ते सुटणार नाहीत. त्या आमदारांकडून पक्षाला अशी अपेक्षा नव्हती. आ. हिरामण खोसकर हे दोन वर्षांपासून वेगळ्या नेत्यांना जोडले गेले. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई होणार असून, यासंदर्भात वरिष्ठांना अहवाल दिला असल्याची माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.

आ. वडेट्टीवार यांनी चांदवड दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, क्रॉस वोटिंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. तसेच विधानसभेचा निकालविरोधात जाणार असल्याचे दिसत असल्याने महायुतीकडून घोषणांचा पाऊस सुरू आहे. मात्र, यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार देणेही मुश्किल होईल. राज्यातील सर्व उद्योग गुजरातला पळवले जात असून, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पैसेही मिळत नसल्याकडे वडेट्टीवारांनी लक्ष वेधले.

ते मर्जीने गेले की मजबुरीने...

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीच्या चर्चेवर वडेट्टीवार म्हणाले, विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे त्यांच्यातील कोणी म्हणतं की अजित पवारांना बरोबर घेऊ नये. त्यामुळे आता पवार हे शाह यांना भेटण्यासाठी मर्जीने गेलेत की मजबुरीने गेले आहेत? हे पाहावं लागेल. तसेच अशोक चव्हाण यांना सुरुवातीला मध्यभागी बसवले, आता पुण्यातील एका कार्यक्रमात कोपऱ्यात बसवले. भविष्यात कोपरे शोधायची वेळ त्यांच्यावर येणार असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.

जनता ठेंगा दाखवणार

महाराष्ट्रात पुन्हा भाजपचं सरकार येत नाही, हे दिल्लीतील नेत्यांना माहिती आहे. महाराष्ट्राला निधी देऊन उपयोग काय? या भावनेतून केंद्र सरकार काम करते आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात त्यांनी महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केले. महाराष्ट्राची फसवणूक करण्याचं काम मोदी सरकारनं केलं आहे. पण येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनता यांना ठेंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा दावा वडेट्टीवार यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT