नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी व गैंगस्टर तथा दहशतवादी अबू सालेमला वैयक्तिक कारणासाठी पॅरोल मंजूर झाला आहे. पॅरोल कालावधीत त्याच्या पोलिस बंदोबस्तासाठी १७.६० लाख रुपये खर्च पोलिस यंत्रणेला त्याला द्यावा लागणार आहे. सदर खर्च मी देऊ शकत नाही, असा अर्ज त्याने न्यायालयात दाखल केला आहे.
या अर्जावरील सुनावणी दि. ५ रोजी उच्च न्यायालयात होणार आहे. त्यानंतर अबू सालेमला पॅरोलदरम्यान बंदोबस्त मिळणार की नाही, हे स्पष्ट होईल. जर बंदोबस्त मिळाला नाही तर सालेमला कारागृहातच राहावे लागणार आहे. अबू सालेम गेल्या २० वर्षांपासून विविध गंभीर गुन्ह्यांप्रकरणी कारागृहात आहे.
दहशतवादी गुन्ह्यातील दोषी असल्याने त्याला कारागृहातून बाहेर नेताना व परत आणताना मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवावा लागतो. कारण अबू सालेमचे प्रत्यार्पण हे पोर्तुगाल देशाने भारताकडे दिले आहे. त्यामुळे सालेम हा आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आहे.
त्याच्या सुरक्षेची जबाबदारी ही पोलिस यंत्रणेची आहे. त्यासाठी किमान ५० हून अधिक अत्याधुनिक हत्यारासह पोलिस अधिकारी व कर्मचारी पुरवावे लागतील त्यासाठीच सदर खर्च लागणार आहे.
जुलै २०२४ पासून सालेम हा नाशिक कारागृहात आहे. नवी मुंबईतील तळोजा कारागृहातील ज्या सेलमध्ये अबू सालेम मागील वर्षी होता, त्या भागातील काही सलच्या भिंती व सीलिंग कमकुवत झाल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला होता.
दुरुस्ती किंवा नव्याने बांधकाम करण्यासाठी अबू सालेमसह काही कैद्यांना अन्य कारागृहात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हणून तळोजा कारागृह नाशिकच्या जवळ असल्याने अबू सालेमला नाशिक कारागृहात हलवण्यात आले.
या संपूर्ण हालचालीदरम्यान कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. नाशिक पोलिस आयुक्तालयातील मोजक्याच अधिकाऱ्यांना याची माहिती होती. १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष टाडा न्यायालयाने अबू सालेमला २५ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पोर्तुगालसोबत झालेल्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगार प्रत्यार्पण करारानुसार त्याला जास्तीत जास्त २५ वर्षेच तुरुंगात ठेवता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अबू सालेमला २०३० पर्यंत कारागृहात राहावे लागणार आहे.
अबू सालेम हा आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आहे. त्याच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मोठा पोलिस बंदोबस्त त्यास द्यावा लागणार आहे. त्यासाठी होणारा खर्च शासकीय दरपत्रकानुसार दिलेला आहे.- संदीप मिटके, सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे)