नाशिक

सप्तशृंगी गडाच्या शिखरावर फडकला कीर्तिध्वज, 500 वर्षांची परंपरा

गणेश सोनवणे

सप्तशृंगीगड: पुढारी वृत्तसेवा; महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर अश्वीन नवमीला मध्यरात्री भगवतीच्या शिखर परंपरेप्रमाणे कीर्तिध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. ध्वज लावण्यासाठी ही परंपरा सुमारे 500 वर्षांपासून सुरू आहे.

दरेगाव येथील आदिवासी समाजाच्या गवळी परिवाराला हा ध्वज लावण्याचा मान आहे. या अद‌्भूत सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने हजेली लावली होती. शिखरावर जाण्यासाठी कुठूनही रस्ता नाही. सरळ शिखरावर जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे असे आहे. मात्र, कसलीही दुखापत न होता, हे कार्य गेल्या कित्येक वर्षांपासून निर्विध्नपणे पार पडते. या सोहळ्यापूर्वी ध्वजाचे देवी संस्थान कार्यालयात सहा जिल्हान्यायाधीश बाळासाहेब वाघ, ध्वजाचे मानकरी गवळी परिवार सदस्य यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. तसेच ध्वजाची वाजत गाजत मिरवणूक काढत देवी मंदिरात ध्वज नेण्यात आला. येथे ट्रस्टच्या विश्वस्त मनज्योत पाटील यांच्यासह भाविक राजू तनवानी यांनी सपत्नीक पूजा केली. यावेळी देवीला नवीन सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले होते.

हजारो भाविकांनी घेतले सप्तशृंगीचे दर्शन

नवरात्रोत्सवाची सांगता महानवमीने होते. या दिवशी दुर्गादेवीच्या सिद्धिदात्री रूपाची पूजा केली जाते. कमळावर विराजमान माता सिद्धिदात्री आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते, अशी देवीच्या भाविकांची श्रद्धा आहे. याशिवाय नवमीच्या दिवशी हवन करणेदेखील शुभ मानले जाते.

कीर्तिध्वज असा

कीर्तिध्वजासाठी मध्यरात्री १२ वाजता शिखरावर जाऊन तेथील पूजा विधी करण्यासाठी १० फूट लांब काठी ११ मीटर केशरी कापडाचा ध्वज पूजेसाठी गहू, तांदूळ, कुंकू, हळद जाणाऱ्या मार्गातील ठिकठिकाणी देवतांसाठी लागणारे साहित्य, नैवेद्य आदींसह साहित्य घेऊन जावे लागते. समुद्रसपाटीपासून ४ हजार ५६९ फूट उंचीवर गड आहे. वर्षभरातून दोन वेळा हा कीर्तिध्वज शिखरावर फडकीवला जातो. यात चैत्र पौर्णिमेचा समावेश आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT