710 kg of drugs seized in three years at nashik
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
धार्मिक अधिष्ठान आणि थंड वातावरणासाठी ओळखले जाणारे नाशिक आता अमली पदार्थांचे शहर म्हणूनही पुढे येत आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. अवघ्या तीनच वर्षांत नाशिकमध्ये तब्बल ७१० किलोंपेक्षा अधिकचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले असून, त्यात सर्वाधिक एमडी (मॅफेड्रॉन) चा समावेश आहे.
पोलिसांनी तब्बल शंभर गुन्हे दाखल केले असून, २०६ संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. याशिवाय तब्बल ११ कोटी ७१ लाख ९१ हजार ९८ रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे. अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर समोर आलेली ही आकडेवारी धक्कादायक असून, नाशिक की 'उडता पंजाब' असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
अंमली पदार्थांसाठी कुप्रसिद्ध असलेले मुंबई आणि ठाण्यातील कारखाने तसेच रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केल्यानंतर मागील काही वर्षांपासून हे रॅकेट नाशिक, मालेगाव आणि धुळ्यासारख्या लहान शहरांमध्ये सक्रिय झाले आहे. दिंडोरी येथील क्लोरल हायड्रेटच्या कारखान्यावरील मुंबई पोलिसांचा छापा, धुळ्यासह मालेगावात पकडलेला नशेच्या शेकडो गोळ्यांचा साठा आणि नाशिकच्या काठे गल्लीत पकडलेल्या निट्राझेपमच्या गोळ्यांच्या स्ट्रिप्स या सर्व घटना नाशिकमध्ये सक्रिय असलेल्या रॅकेटचे संकेत देत आहेत.
मागील तीन वर्षांपासून हे रॅकेट नाशिकमध्ये अधिकच सक्रिय झाले असून, दर आठवड्याला एमडी व तत्सम अमली पदार्थाची विक्री करणारे पोलिसांच्या जाळ्यात अडकत आहेत. अमली पदार्थ विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर मागील तीन वर्षांतील पोलिसांनी सादर केलेली आकडेवारी धक्कादायक असून, नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक अधिष्ठानाला धक्का पोहोचविणारी आहे.
२०२३ ते २५ जून २०२५ पर्यंत पोलिसांनी एमडी विक्रीप्रकरणी तब्बल २६ गुन्हे दाखल केले आहेत. गांजा विक्रीप्रकरणी २८ गुन्हे दाखल आहेत. चरस व भांग प्रकरणी चार गुन्हे दाखल असून, सेवन प्रकरणी ४३ गुन्हे शहरातील विविध पोलिस ठाण्यांत दाखल आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे अमली पदार्थ सापडण्याचा ग्राफ वाढतच असून, जानेवारी ते २५ जून २०२५ पर्यंत तीन वर्षांतील १०० गुन्ह्यांपैकी ५४ गुन्हे अवघ्या सहाच महिन्यांत दाखल झाले आहेत. त्यामुळे शहरात अमली पदार्थाचे रॅकेट वाढतच असून, पोलिसांनी वेळीच याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. अन्यथा पुढील काही महिन्यांत नाशिकचा उडता पंजाब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.