

Thanagaon Bhalevadi Ploughing with Wife Mother
नाशिक : शेतीची मशागत करण्यासाठी बैल नसल्याने आदिवासी शेतकऱ्याला आई व पत्नीच्या सहाय्याने नांगर ओढून शेतीची नांगरणी करण्याची वेळ आली आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी जीवाचा आटापिटा करून तालुक्यातील ठाणगावच्या भलेवाडीतील हे कुटुंब आपला उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करत आहे.
भलेवाडी येथील सुनील जनार्दन मेंगाळ यांची डोंगरदऱ्याच्या कुशीत थोडी शेती आहे. दरवर्षी केवळ पावसाळ्यातच त्यांना आपली शेती करता येते. त्यानंतर त्यांचे सर्व कुटुंब मोलमजुरीचे काम करते. शेतीकरता लागणाऱ्या बैलांची किंमत वाढतच चालली असताना बैलांना लागणारा चारा, त्यावर होणारा खर्च सर्वांनाच परवडणारा नाही. मेंगाळ यांची बैल घेण्याइतकी व ट्रॅक्टरने नांगरणी करण्याइतकीही आर्थिक परिस्थिती नसल्याने शेतीची मशागत करायची कशी? असा प्रश्न त्यांना पडला.
यावेळी त्यांची आई भीमाबाई जनार्दन मेंगाळ आणि पत्नी इंदुबाई सुनील मेंगाळ यांनी पुढे येत आम्ही दोघी स्वतः नांगर ओढून नांगरणी करू, असे त्यांना सांगितले. त्यानंतर मेंगाळ यांनी आई आणि पत्नीला थेट बैलाच्या ठिकाणी जुंपून आपल्या जमिनीत नांगर ओढत नांगरणी पूर्ण केली. त्यानंतर त्यांच्या शेतातील पेरणीही पूर्ण केली. त्यासाठी त्यांनी शेतीला लागणारे यंत्र अगोदरच तयार करून घेतले होते. या प्रयोगामुळे त्यांची बचत झाली असली तरी आई व पत्नीला घ्यावी लागलेली मेहनत त्याहून खूप मोलाची ठरली आहे. मेंगाळ यांच्यासह त्यांचे कुटुंब सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहे.