शहरातील अतिधोकादायक ४६७ वाडे 'जैसे थे' file photo
नाशिक

Nashik | शहरातील अतिधोकादायक ४६७ वाडे 'जैसे थे'

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : शहरातील १,१८१ धोकादायक वाडे, जुन्या घरांना महापालिकेने पावसाळ्यापूर्वी नोटिसा बजावल्या. त्यापैकी ४६८ अतिधोकादायक वाडे कोसळण्याच्या स्थितीत असल्यामुळे ते तातडीने उतरविणे गरजेचे होते. परंतु, वारंवार नोटिसा बजावल्यानंतर नाशिक पश्चिम विभागातील तेली गल्ली परिसरातील वाडेधारकाने वाडा उतरविण्याची तयारी दर्शवत त्यासाठीचा १.४६ लाखांचा खर्च महापालिकेकडे जमा केला. महापालिकेने हा वाडा उतरवत परिसर सुरक्षित केला. परंतु, अद्यापही ४६७ अतिधोकादायक वाडे कायम आहेत.

विभाग- धोकादायक घरे, वाडे

नाशिक पश्चिम - ६९०

सातपूर - ६१

नाशिक पूर्व - १२७

नवीन नाशिक - ५०

पंचवटी - १७६

नाशिक रोड - ७७

एकूण - ११८१

शहरात दीड लाखांवर मिळकती ३० वर्षांहून अधिक जुन्या असून, सुमारे २५ हजार १०२ मिळकती या ७० वर्षांहून अधिक जुन्या आहेत. महापालिकेने वारंवार सूचना देऊनही संबंधित मिळकतधारकांनी इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट केलेले नाही. महापालिकेने काही वर्षांपूर्वी विभागीय अधिकाऱ्यांमार्फत केलेल्या सर्वेक्षणात यापैकी तब्बल १,१८१ जुने वाडे, जीर्ण घरे धोकादायक असल्याचे आढळले होते. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी या धोकादायक वाडे, घरांना महापालिकेतर्फे नोटिसा बजावण्यात येतात. मात्र संबंधित वाडे, घरांच्या मालकांकडून या नोटिसींना केराची टोपली दाखविली जाते. या १,१८१ पैकी ४६८ जुने वाडे, घरे अतिधोकादायक स्थितीत आहेत. त्या ठिकाणी वादळी पाऊस, वाऱ्यामुळे आपत्ती ओढवण्याची शक्यता लक्षात घेत महापालिकेने संबंधित मालकांना अंतिम नोटिसा बजावत धोकादायक वाडे, घरे तातडीने उतरविण्याचा अल्टिमेटम दिला होता. त्यास तेली गल्लीतील रहाळकर रोडवरील एकाच वाडेधारकाने प्रतिसाद देत वाडा उतरविण्यासाठी महापालिकेकडे एक लाख ४६ हजारांची रक्कम भरली. त्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने खासगी मक्तेदाराकडून त्या वाड्याचे पाडकाम करत परिसर सुरक्षित केला.

मात्र, उर्वरित ४६७ अतिधोकादायक वाड्यांच्या मालकांनी अद्यापही महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद दिलेला नाही. या वाड्यांमध्ये नागरिक जीव मुठीत धरून वास्तव्य करत आहेत.

वीज, पाणी तोडणार

अतिधोकादायक वाडे, जीर्ण झालेली घरे, इमारती कोसळून जीवित व वित्तहानी होण्याचा धोका आहे. वारंवार नोटिसा बजावूनदेखील संबंधित मालक, भोगवटदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अखेर या वाड्याचे पाणी व वीज कनेक्शन तोडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, तसे निर्देश विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. नागरिकांनी स्वत:हून घरे, वाडे रिकामी केले नाहीत, तर महाराष्ट्र महापालिका अधिनियम २६८ नुसार पोलिसांच्या मदतीने घरे व इमारती रिकाम्या करण्यात येतील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT