25 thousand crore plan for Simhastha, focus on infrastructure
नाशिकः पुढारी वृत्तसेवा नाशिक- त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विविध विकासकामांसाठी राज्य आणि केंद्र सरकार मिळून २५ हजार ५५ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने प्रशासकीय तसेच विकासकामांना गती दिली आहे. राज्य शासनाकडून विकासकामांसाठी ७ हजार ४१० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
सिंहस्थ कुंभमेळ्यास आता २१ महिन्यांचा कालावधी राहिला आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांना आवश्यक पायाभूत सोयी सुविधा उपलब्धतेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच शासनाने नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण स्थापन केले असून प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध विकासकामांना प्रशासकीय मंजुरी प्रदान करीत विकासकामे, पायाभूत सोयी सुविधांच्या कामांना चालना दिली आहे.
राज्य शासनाने रस्ते विकासासाठी २ हजार २७० कोटी ६१ लाख रुपये आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणच्या पहिल्या टप्प्यातील विविध विकास कामांसाठी ५ हजार १४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यात महापालिकेच्या मलनिस्सारण प्रकल्प, रस्ते, पूल, ओएफसी केबल, सीसीटीव्ही अग्निशमन आदी कामांसाठी ३ हजार १६ कोटी २० लाख रुपये, जलसंपदा विभागाला घाट बांधणे, बॅरेज, उपसा सिंचन योजनेसाठी ७५० कोटी ५४ लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे.
त्र्यंबकेश्वर नगरपालिकेला मलनि:स्सारण प्रक्रिया, सांडपाणी व्यवस्थापनासाठी १६५ कोटी ८८ लाख रुपये, वीज वितरण कंपनीला उपकेंद्र उभारणीसाठी ७३ कोटी ५० लाख रुपये, राज्य पुरातत्व विभागाला ४८ कोटी ७८ लाख रुपये, नाशिकमधील साधूग्रामच्या भूसंपादनासाठी एक हजार ५० कोटी रुपये, तर शिल्ल्क रक्कम ३५ कोटी ११ लाख रुपये असा पाच हजार १४० कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून प्राप्त झाला आहे. सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणामार्फत कामाच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यात येत असून कामाचा वेग आणि गुणवत्तेबाबत अध्यक्ष डॉ. गेडाम यांनी सर्व विभागांना मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत. आयुक्त सिंग यांनीही कामांचा दैनंदिन आढावा घेण्यास सुरुवात केली असून कामे वेळेत पूर्ण होतील, असे नियोजनही केलेले आहे.
कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याच्या संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. या कामांच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर भर देण्यात येत आहे, सर्व कामांचे प्रत्येक टप्प्यावर संनियंत्रण करण्यात येत असून त्याचा आढावा घेतला जात आहे.- डॉ. प्रवीण गेडाम, अध्यक्ष, कुंभमेळा प्राधिकरण
कुंभमेळा सुकर, सुलभ आणि पर्यावरणपूरक होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध प्रकल्पांनी गती घेतली आहे. त्यामुळे कुंभमेळा कामांना चालना मिळाली असून ते वेळेत पूर्ण होतील.- शेखर सिंह, आयुक्त, कुंभमेळा प्राधिकरण