नाशिक : राज्याच्या अर्थसंकल्पात नाशिक-त्र्यंबक रस्त्याच्या काँक्रिटीकरण व सहापदरीकरणासाठी 350 कोटी, नाशिक-दिंडोरी-वणी रस्त्यासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सिंहस्थासाठी 91 किमी रिंगरोड साकारला जाणार असून, एकूण 2270 कोटींचा निधी रस्ते विकासासाठी मंजूर झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग लवकरच या प्रकल्पांना सुरुवात करणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त प्रविण गेडाम यांनी दिली.
या मार्गांचा होणार विकास
नाशिक-दिंडोरी रस्त्यावरील उनंदा नदीवरील पूल : 15 कोटी
दुगाव ते जऊळके त्र्यंबकसाठी : 215 कोटी
जानोरी-ओझर 50 कोटी, भरवीर टाकेद, बैज यासाठी : 119 कोटी
चिंचोली-वडगाव पिंगळा-विंचूर दळवी-पांढुर्ली रस्ता : 207 कोटी
वाडीवर्हे, दहेगाव, जातेगाव, तळेगाव, महिरावणी, दुडगाव, गणेशगाव रस्ता : 200 कोटी
दुगाव-ढकांबे-जऊळके रस्ता : 163 कोटी, शिर्डी-राहता बाह्यवळण रस्ता : 165 कोटी
त्र्यंबकेश्वर-तुपादेवी-तळवाडे-उमराळे-दिंडोरी-पालखेड जोपुळ-पिंपळगाव : 215 कोटी
दुगाव, जुने घागुर, ढकांबे, आंबे दिंडोरी, जऊळके रस्ता : 163 कोटी
पेठ, तोरंगण, हरसूल, वाघेरा, अंबोली, पहिने, घोटी रस्ता : 205 काटी
जानोरी-ओझर आंतरराष्ट्रीय विमानतळ : 50 कोटी
आडगाव, गिरणारे, वाघेरा, हरसूल, ओझरखेड रस्ता : 157 कोटी
त्र्यंबक,देवगाव, खोडाळा रस्ता : 47 कोटी
इतर कामांसाठी 17 कोटी
दर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भातील कामांचा आढावा घेतला जात आहे. बैठकीनंतर अधिकाऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नाशिकमध्ये भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन रस्ते सुस्थितीत ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. दोन वर्षे लागणाऱ्या रस्त्यांच्या कामांना लवकरच सुरुवात होईल. गोदाघाटावरील घाटांची निर्मिती, रस्त्यांची दुरुस्ती व डागडुजी आदी कामे सुरू होतील. पोलिस दलाच्या ट्रॅफिक नियोजनानुसार आवश्यक रस्ते, घाट, पूल यांचे नियोजन करण्यात आले असून त्यानुसार विकासकामे केली जातील.
आयुक्त गेडाम यांनी सांगितले की, नाशिक रेल्वेस्थानकाच्या विकासासाठी बैठका घेण्यात येत आहेत. स्थानकालगत मनपाची ११ एकर व एसटी महामंडळाची ३४ गुंठे जागा दुरुस्ती व सुशोभीकरणासाठी वापरण्यात येणार आहे. तसेच ओढा व देवळाली येथे नवीन रेल्वेस्थानके उभारून तिथे रेल्वे थांबवण्याची व्यवस्था केली जाईल. गोदाघाटाकडे लोकांची वाहतूक सुलभ करण्याचेही नियोजन सुरू आहे.
अत्यंत दुरवस्था झालेल्या नाशिक-दिंडोरी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शासनाने अर्थसंकल्पात १०० कोटींची तरतूद केली असून लवकरच काम सुरू होणार असल्याची माहिती डॉ. गेडाम यांनी दिली. तर, राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि ९१ किमीच्या रिंगरोडला जोडण्यासाठी एसएच-37 राज्यमार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. या मार्गाच्या रुंदीकरण व दुरुस्तीमुळे सिंहस्थात देशभरातून येणाऱ्या चारचाकी वाहनांना सुलभ प्रवेश मिळणार आहे.