Nashik Kumbh Mela 2027 | सिंहस्थासाठी स्वतंत्र कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्याचे निर्देश

कुंभमेळा आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश
Nashik Kumbh Mela 2027 |
नाशिक : कुंभमेळा बैठकीप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांसह उपस्थितीत विविध विभागांचे सचिव व अधिकारीवर्ग.Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सन 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आता स्वतंत्र कुंभमेळा प्राधिकरण असणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळ्याची कामे वेगाने व वेळेत पूर्ण व्हावी यासाठी वेगवेगळे कुंभमेळा प्राधिकरण निर्माण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच धार्मिक कॉरिडॉर निर्माण करण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले आहेत.

आगामी कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात बुधवारी (दि. 26) मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत दुसरी आढावा बैठक झाली. बैठकीस जलसंपदामंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांसह विविध विभागांचे सचिव, अधिकारी उपस्थित होते. डॉ. गेडाम यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने सादरीकरण केले.

मुख्यमंत्र्यांनी गत बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार नाशिकमधील एक पथक प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याच्या तयारीची माहिती घेण्यास पाठविण्यात आले होते. या पथकाने नोंदविलेल्या सूचना व त्या अनुषंगाने सिंहस्थ कुंभमेळ्यात करावयाच्या सोयी-सुविधांचा आढावा यावेळी घेण्यात आला. सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन सुव्यवस्थित व्हावे, सर्व यंत्रणांचा समन्वय व्हावा, कुंभमेळ्याची कामे गतीने व्हावीत, यासाठी कुंभमेळा प्राधिकरण तयार करावे यासाठी कुंभमेळा प्राधिकरण कायदा तयार करण्यात यावा. कुंभमेळ्यासाठी लागणारे मनुष्यबळ कुंभमेळा प्राधिकरणाच्या अखत्यारित घ्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत दिल्या.

फेरआराखडे तयार करावीत

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी यापूर्वीच प्राथमिक आराखडा तयार केला होता. मात्र, प्रयागराजमधील महाकुंभासाठी झालेली गर्दीची परिस्थिती पाहता नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आणखी चार ते पाच पट गर्दीच्या अनुषंगाने जास्तीचे नियोजन करण्यात यावे. गर्दीचे व्यवस्थापन, घाटांची संख्या, रस्ते, रेल्वे व हवाई वाहतुकीचे नियोजनही या आराखड्यात असावे. नाशिक-त्र्यंबक रस्ता 24 मीटर वाढविण्यात यावा. तसेच या रस्त्यांच्या कडेला टेंट सिटी उभारण्यासंदर्भातही विचार करावा. नाशिक शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करावीत. गोदावरी नदीच्या काठावर किनारी रस्ता तयार करता येईल का याचा ड्रोन सर्व्हे करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

धार्मिक कॉरिडॉर निर्माण करावे

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आलेला भाविक हा जवळच्या त्र्यंबकेश्वर, शिर्डी, वणी, शनिशिंगणापूर, मांगीतुंगी अशा धार्मिक स्थळांनाही भेट देतो. त्या अनुषंगाने या धार्मिक स्थळांचे कॉरिडॉर तयार करावे. नाशिकमधील रामकालपथाचे काम पुढील वर्षीपर्यंत पूर्ण करावे. तसेच त्र्यंबकेश्वर मंदिराच्या संवर्धनाचे काम हाती घ्यावे. त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्तासह इतर कुंडांच्या सौंदर्यीकरण केल्यास भाविकांना तेथे जाता येईल. त्याशिवाय नाशिक व त्र्यंबकेश्वर मंदिरांच्या शेजारील अतिक्रमणे तातडीने हटविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह जिल्हयातील मंत्री दूर

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दुसऱ्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह जिल्हयातील मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह खासदार, शहरातील आमदार यांना डावलण्यात आले. बैठकीला जिल्ह्यातील मंत्री, आमदार, खासदार यांना निमंत्रण नसल्याने ते उपस्थिती नसल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे केवळ जलसंपदा मंत्री गिरीष महाजन बैठकीस उपस्थितीत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news