21 Gram Panchayat members re-eligible, revised order issued by Revenue Department
देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा नाशिक तालुक्यातील बेलतगव्हाण ग्रामपंचायतीचे सरपंच मोहनीश दोंदे यांच्यासह आठ ग्रामपंचायतीतील २१ सदस्यांना २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीत मुदतीत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करूनही संबंधित विभागाकडून विनाखातरजमा करत अपात्र ठरवण्यात आले होते. याबाबत सरपंच दोंदे यांनी उपोषणाचा इशारा दिल्याने शासकीय यंत्रणेने चूक दुरुस्त करत २८ ऑक्टोबरला सुधारित आदेश काढत अपात्र ठरवलेल्या २१ सदस्यांना पुन्हा पात्र ठरवले आहे.
नाशिक तालुक्यात जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विल्होळी, मातोरी, पिंपरीसिद्ध, दोनवाडे, कालवी व बेलतगव्हाण येथील २१ सदस्यांना अपात्र ठरवण्यात आले होते. यात बेलतगव्हाणचे सरपंच मोहनीश दोंदे यांच्यासह दोन सदस्यांचा समावेश होता. राखीव जागेवर निवडणूक लढवणाऱ्या सदस्यांना १२ महिन्यांची वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत देण्यात आली होती.
शासनाने वेळोवेळी ही मुदत ९ जुलै २०२४ पर्यंत वाढवली. मुदतीत प्रमाणपत्र सादर करूनही महसूल कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे तत्कालीन अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी नाशिक तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींचे सरपंच व सदस्य अशा २१ सदस्यांना अपात्र घोषित केले होते. याबाबत दोंदे यांनी १४ जानेवारी २०२२ ला जातपडताळणी प्रमाणपत्र सादर केल्याचा खुलासा केला. तरीही त्यांना सतत नोटिसा येत होत्या.
आम्ही लोकशाही मार्गाने लढा दिल्याने अखेर शासकीय यंत्रणेला चूक मान्य करून ती दुरुस्त करावी लागली. अशा कर्मचाऱ्यांमुळे लोकशाहीचा खून होत आहे.- मोहनीश दोंदे, सरपंच,