नाशिक : शिक्षण मंडळाची वेबसाइट सुरळीत झाल्याने अखेर सोमवार (दि. २६) पासून अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. प्रवेशाच्या पहिल्या फेरीत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना ३ जूनपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. या फेरीतील पात्र विद्यार्थ्यांची प्राथमिक निवडयादी १० जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
गेल्या आठवड्यात अकरावी प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरण्याचा सराव केला होता. पहिले दोन दिवस म्हणजे मंगळवार (दि. २०) पर्यंत प्राधान्यक्रम नोंदणीचा सराव करण्याची सुविधा देण्यात आली होती. त्यानंतर प्रत्यक्ष ऑनलाइन नोंदणीला बुधवारी (दि. २१) सुरुवात होणार होती. परंतु, तांत्रिक कारणांनी प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी मंडळाची वेबसाइट ठप्प झाल्याने शिक्षण संचालनालयावर सुधारित वेळापत्रकांसह प्रक्रिया रावबण्याची नामुष्की ओढवली. यात विद्यार्थी पालकांनाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यानंतर तांत्रिक चुका सुधारून शिक्षण विभागाने वेबसाईटचे कार्यान्वयन केले. सोमवार (दि. २६) पासून राज्यभरात पहिल्या फेरीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. या फेरीसाठी विद्यार्थी महाविद्यालयांचे प्राध्यान्यक्रम नोंदवणार आहेत. त्यासाठी ३ जून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदत असणार आहे.
दरम्यान, सोमवारी सकाळी अनेक विद्यार्थ्यांना नोंदणी करताना अडचणी आल्याचे दिसून आले. इंटरनेट कॅफेवर गर्दी झाली होती तर प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांच्या प्रति काढण्यासाठी अनेक केंद्रावर गर्दी झाली होती.
प्रवेश क्षमता - १८ लाख ७७ हजार ८३१
कोट्यांर्तगत उपलब्ध जागा - २ लाख १४ हजार ५११
कनिष्ठ महाविद्यालये - ९ लाख ३७६.
एकूण प्रवेश क्षमता - २० लाख ९२ हजार ३५०