

नाशिक : अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी वेबसाईट ठप्प झाल्याने पहिल्याच दिवशी प्रक्रियेचा बोजवारा उडल्यानंतर आता सोमवार (दि.२६) सकाळी ११ वाजेपासून नव्याने प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचे शासनाच्या शिक्षण विभागाने जाहीर केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना दुसऱ्या दिवशीही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. या गलथान कारभारामुळे शिक्षण विभाग विद्यार्थ्यांची परीक्षा घेत आहे का अशा प्रतिक्रिया विद्यार्थी-पालकांकडून उमटल्या.
यंदा संपूर्ण महाराष्ट्रात केंद्रिभूत पद्धतीने अकरावी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. १९ आणि २० मे रोजी नोंदणीचा सराव करण्यासाठी वेळ देण्यात आला होता. डमी अर्ज भरल्यानंतर बुधवार (दि. २१) पासून प्रत्यक्ष अर्ज भरणे आणि महाविद्यालय पसंतीक्रम भरण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ होणार होता. मात्र प्रक्रियेसा सुरू करण्यात आलेली वेबसाईट पहिल्याच दिवशी ठप्प झाली. गुरुवारी (दि.२२) दुपारी ३ वाजता नवीन वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही आशा होती. मात्र, दुसऱ्याही दिवशी वेबसाईट उघडली असता केवळ पहिलेच पेज दिसत होते. ॲडमिशन शेड्युलसह अन्य काही तपशीलासाठी संंबंधित मुद्द्यांवर क्लिक केले असता काहीच माहिती मिळत नसल्याची स्थिती होती. अखेर सायंकाळी ठप्प झालेली प्रवेश प्रक्रिया साेमवार (दि.२६) पासून सुरू केली जाईल, असे सांगण्यात आले. याबाबत येथील शिक्षण विभाग कार्यालयाशी संपर्क साधला असता सोमवारी (दि. २६) सकाळी ११ वाजता पोर्टल सुरू झाल्यानंतरच सर्व माहिती, तपशील दिसणार आहे, असे सांगण्यात आले. यामुळे दुसऱ्या दिवशीही संपूर्ण दिवसभर विद्यार्थ्यांमध्ये प्रवेशाबद्दल गाेंधळाची स्थिती, मनस्ताप दिसून आला. अनेकांनी गुरुवारी (दि.२२) प्रक्रिया सुरु होईल या अपेक्षेने दिवसभर वेबसाईटला भेट दिली. मात्र त्यांची घोर निराशा झाली.
अकरावी प्रवेशाचा बोजवारा उडाल्यानंतर गुरुवारी (दि. २२) सायंकाळी प्रवेशासाठी शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग) पुणे, यांच्याकडून अधिकृत व्हॉटसअप चॅनल सुरू करत असल्याचे जाहीर करण्यात आले. या चॅनलवर सर्व अद्ययावत तपशील दिला जाईल, असे शिक्षण विभागाने यामाध्यमातून जाहीर केले.
राज्यभरात प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याने शासनाकडून त्याबाबत पूर्वतयारी, संभाव्य अडचणीं डोळ्यांसमोर ठेऊन नियोजन करायला हवे होते. ते न झाल्याने त्याचा मनस्ताप विद्यार्थी, पालकांना सहन करावा लागतोय. शासन ११ प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची परीक्षा घेत आहे का? आता २६ मे नंतर तरी सर्व सुरळीत सुरू व्हावे ही अपेक्षा.
जयश्री आहेरराव, पालक, नाशिक.