उत्तर महाराष्ट्र

राज्यातील 45 उपजिल्हाधिकार्‍यांंना अपर जिल्हाधिकारीपदी पदोन्नती, नाशिकमधील ‘यांचा’ समावेश

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील महसूल विभागातील अधिकार्‍यांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त लागला आहे. सरकारने गुरुवारी (दि. 18) रात्री उशिरा काढलेल्या आदेशामध्ये 45 उपजिल्हाधिकार्‍यांना अपर जिल्हाधिकारीपदी पदोन्नती दिली आहे. त्यामध्ये उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, प्रज्ञा बढे व सरिता नरके यांचा समावेश आहे.

कोरोनाचे संकट आणि त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला सत्तेच्या सारीपाटामुळे महसूल संवर्गातील अधिकार्‍यांच्या बदल्या रखडल्या होत्या. त्यामुळे अधिकार्‍यांमध्ये चलबिचल होती. अखेर शासनाने 20 वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या 45 उपजिल्हाधिकार्‍यांना अपर जिल्हाधिकारी पदावर पदोन्नती दिली आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने अधिकार्‍यांना पदोन्नती देण्याची गेल्या काही वर्षांतील पहिलीच बाब ठरली आहे.

शासनाने पदोन्नती दिलेल्या अधिकार्‍यांमध्ये नाशिकरोड येथील महसूल प्रबोधिनी येथे कार्यरत असलेले उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांचा समावेश आहे. नाशिक विभागातील उपजिल्हाधिकारी प्रज्ञा बढे – मिसाळ, सरिता नरके, देवदत्त केकाण आणि सुहास मापारी यांचाही समावेश या यादीत आहे. त्यामध्ये बढे – मिसाळ, नरके व केकाण यांनी नाशिक जिल्ह्यातील विविध पदांवर काम केले आहे. दरम्यान, बढे या सध्या धुळे येथे निवडणूक शाखेत उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत. सरिता नरके या पुणे येथे जमाबंदी आयुक्तालय, तर केकाण हे नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे प्रांताधिकारी आहेत. मापारी हे नोंदणी महासंचालक कार्यालयात कार्यरत आहेत. निवड झालेल्या या सर्व अधिकार्‍यांना आता त्यांच्या पुढील पदस्थापनेची प्रतीक्षा असणार आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT