उत्तर महाराष्ट्र

Nashik : चोरीचा एकच पॅटर्न, घरफोड्या सहा; 9 लाखांचा मुद्देमाल केला लंपास

गणेश सोनवणे

नाशिक (कळवण) पुढारी वृत्तसेवा

अभोणा येथे आज पहाटे ६ ठिकाणी घरफोडी झाली. घरफोडीत सुमारे ९ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. चोरट्यांनी बंद घराचे कुलूप, कडी कोंडके तोडून घरात प्रवेश करीत घरफोडी केली. याघटनेने परिसरात दहशत पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकाच रात्री गावातील वेगवेगळ्या भागात सुमारे ६ ठिकाणी चोरांनी घरफोडी केली. घराचे कुलूप, कडी कोंडके तोडून चोरांनी घरात प्रवेश केला. एकाच रात्री झालेल्या घरफोडीत ९ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे पोलिसांत नमूद केले आहे. मात्र प्रत्यक्षात रोख रक्कम अधिक असल्याचे फिर्यादी घरमालकांकडून सांगण्यात आले.

अभोणा शहर येथे गेल्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या घरफोडीशी साधर्म्य असणाऱ्या या घरफोड्या असून, अभोणा शहरातील १२ घरफोड्या व कनाशी येथील डॉ. विठ्ठल बहिरम यांच्या घरी झालेली जबरी चोरी यांचा तपास लावण्यात अभोणा पोलीस व संबंधित यंत्रणा असमर्थ असल्याने चोरांची मुजोरी वाढली आहे. घरफोडीच्या प्रमाणात दिवसागणिक वाढ होताना दिसून येत आहे.

अभोणा येथे गेल्या १ वर्षाच्या कालावधीत आत्ता पर्यंतच्या सर्वाधिक चोऱ्या झाल्या असून या सर्व चोऱ्यांमध्ये चोरट्यांनी तोडलेले कुलुप व कडी कोंडके हा पॅटर्न सारखाच असल्याचे निदर्शनास आले आहे. आत्ता पर्यंतच्या झालेल्या चोऱ्यांमध्ये ५ ते ६ चोरटे रात्री फिरताना दिसत असून, आज पहाटे झालेल्या चोरीमध्ये देखील तोच पॅटर्न चोरट्यांनी वापरला असल्याने चोरीच्या तपासात पोलीस यंत्रणा सपशेल फेल ठरली असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान अभोणा पोलिसांकडून झालेल्या ६ घरफोडीतील माहिती विचारली असता यंत्रणेकडून पूर्ण माहिती देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT