उत्तर महाराष्ट्र

नाशिक : दारूविक्रीविरोधात महिलांचा एल्गार

अंजली राऊत

कळवण : पुढारी वृत्तसेवा
कनाशी पश्चिम पट्ट्यातील वेरूळे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या वेरूळे, अंबापूर, दखणीपाडा या गावात हातभट्टीची दारूविक्री करणार्‍या 40 परिवारांविरोधात आदिवासी महिलांनी थेट अभोणा पोलिस ठाणे गाठत दारूविक्रीविरोधात एल्गार पुकारला आहे. महिलांनी पोलिसांकडे केलेल्या लेखी तक्रारीत मद्यपी आणि दारूविक्रेत्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

दळवट, शिंगाशी या गावात आदिवासी महिलांच्या पुढाकारामुळे पूर्ण दारूबंदी झाल्यामुळे आजूबाजूच्या गावातील तळीराम वेरूळे, अंबापूर येथे गावठी दारू पिण्यासाठी येतात. दारूविक्रीचा धंदा जोरात सुरू असल्याचे बचतगटाच्या महिला व ग्रामपंचायतीकडून करण्यात आलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सहज उपलब्ध होणार्‍या या दारूच्या आहारी वयोवृद्ध लोकांसोबत तरुणवर्ग व 15 ते 20 वयोगटांतील मुले गेले आहेत. गावात आणि घरोघरी मद्यपींमुळे भांडण-तंट्यांचे प्रकार वाढले आहेत. महिलांनी मोलमजुरी करत कमविलेले पैसे हिसकावून घेत ते पैसे पुरुष मंडळी दारूवर उडवत असल्याचा आरोप महिलावर्गाकडून करण्यात आला. त्यामुळे संसार उघड्यावर आले आहेत. तळीराम महिला व लहानग्यांना रोजच मारहाण करीत असल्याने कोटुंबिक सुरक्षाही धोक्यात आली आहे. सततच्या त्रासाला कंटाळलेल्या आदिवासी महिलांनी आज दुपारी एकला अभोणा पोलिस ठाणे गाठले. सुमारे 200 आदिवासी रणरागिणींनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सरपंच कमलाकर बागूल, उपसरपंच कौशल्या कुवर, ग्रामसेविका वंदना बागूल यांच्यासह महिला बचत गटाच्या महिलांनी अभोणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन शिंदे यांना निवेदन देत कडक कारवाईची मागणी केली.

कुटुंबव्यवस्था मोडकळीस येऊ नये, यासाठी कारवाई केली जाईल. दारूबंदीसाठी प्रयत्न केले जातील. तसेच तळीरामांचा बंदोबस्त केला जाईल. -नितीन शिंदे, पोलिस उपनिरीक्षक.

राज्य उत्पादन शुल्क कोमात : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वणीमधील पथकाची गाडी दर महिन्याच्या दोन तारखेस हमखास दिसते. ही गाडी नेमकी काय करते, असा अर्थपूर्ण प्रश्न कळवण तालुक्यातील जनतेकडून विचारण्यात येत आहे.

"गावात अवैध दारूविक्रीमुळे ग्रामीण भागातील तरुण व्यसनाधीन झाले असून, महिलांवरील अत्याचारांत वाढ होत आहे. त्यामुळे तत्काळ कारवाई करावी." – अनिता पवार, ग्रामस्थ.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT