उत्तर महाराष्ट्र

नाशिक : ‘मविप्र’साठी आज मतदान; जिल्ह्यातील १४ केंद्रांवर १०,१९७ मतदार बजविणार हक्क

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्‍यातील दुसऱ्या क्रमांकाची शैक्षणिक संस्‍था म्हणून ओळख असलेल्‍या मराठा विद्या प्रसारक समाज संस्‍थेच्‍या २०२२ ते २७ या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा शनिवारी (दि.२७) थंडावल्या आहेत. रविवारी (दि.२८) जिल्ह्यातील १४ मतदान केंद्रांवरील ५३ बूथमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील १० हजार १९७ सभासद मतदार मतदानाचा हक्क बजविणार आहे. त्यामध्ये ८ हजार ८४४ पुरुष तर १ हजार ३५३ महिलांचा समावेश आहे.

मविप्र संस्थेच्या २४ जागांसाठी पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, सभापती व उपसभापती या सहा प्रमुख पदांसह दोन महिला संचालक, १३ तालुका संचालक आणि तीन सेवक संचालक आदी पदांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी नीलिमा पवार यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनल, तर ॲड. नितीन ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलमध्ये सामना रंगत आहे. दोन्ही पॅनलकडून मातब्बर उमेदवारांना रिंगणात उतरविण्यात आल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे. सरचिटणीसपदासाठी 'प्रगती'कडून नीलिमा पवार तर 'परिवर्तन'कडून ॲड. नितीन ठाकरे यांच्यात सरळ लढत होत आहे. अध्यक्षपदासाठी डॉ. सुनील ढिकले आणि आमदार माणिकराव कोकाटे आमने-सामने आले आहेत. सभापतिपदासाठी माणिकराव बोरस्‍ते आणि बाळासाहेब क्षीरसागर यांच्‍यात सामना होणार आहे. त्यामुळे सरचिटणीसपदासह अध्यक्ष आणि सभापतिपदाची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. दाेन्ही पॅनलकडून संपूर्ण जिल्हा पिंजून काढत सभासद-मतदारांसोबत संवाद साधण्यात आला आहे. प्रचार सभा व मेळाव्‍यांच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याने वातावरण तापले आहे.

२४ जागांसाठी ५६ उमेदवार : रविवारी (दि.२८) सकाळी ८ ते सायं. ४ यावेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. २४ जागांसाठी ५६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सभासद मतदारांना यंदा प्रथमच उपाध्यक्ष व दोन महिला प्रतिनिधींसाठी मतदान करावे लागणार आहे. त्यासाठी सहा रंगांच्‍या मतपत्रिका निश्चित करण्यात आल्या आहेत. शनिवारी (दि.२७) सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर साहित्य रवाना झाले.

सुमारे साडेसहाशे कर्मचार्‍यांची नियुक्ती : मविप्र निवडणुकीसाठी सुमारे साडेसहाशे कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 53 बूथवर प्रत्येकी 11 कर्मचारी असणार असून, त्यामध्ये प्रोसायडिंग ऑफिसर, असोसिएट ऑफिसर, पोलिंग ऑफिसर तसे शिपायाचा समावेश आहे. प्रत्येक केंद्रावर संगणक तज्ज्ञ तसेच वैद्यकीय पथक तैनात असणार आहे. केवळ केंद्र क्रमांक 52 व 53 मध्ये कर्मचार्‍यांची संख्या कमी असणार आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT