उत्तर महाराष्ट्र

नाशिक : अवकाळीचा साडेसात हजार हेक्टरवरील पिकांना तडाखा

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ७ हजार ४२५ हेक्टरवरील पिकांना तडाखा बसला आहे. तब्बल ५६० गावांमधील रब्बी हंगामीतील पिके मातीमोल झाली आहेत. त्यामुळे १८ हजार ९९० शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, नुकसानभरपाईसाठी १४ कोटी १० लाख २१ हजार रुपयांची गरज आहे. जिल्हा प्रशासनाने तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे.

चालू महिन्यात राज्याला अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपून काढले आहे. नाशिक जिल्हाही त्यामधून सुटलेला नाही. जिल्ह्यात १५ ते १९ मार्च याकाळात ठिकठिकाणी अवकाळीसह मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. परिणामी, रब्बी हंगामाच्या पिकांसह भाजीपाल्याला त्याचा फटका बसला. राज्य शासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करत अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हास्तरीय यंत्रणांना दिले होते. कृषी विभागाने मंगळवारी (दि.२८) पंचनाम्यांचा अंतिम अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. त्यानुसार जिल्ह्यात तब्बल ३ हजार ५५६ हेक्टरवरील कांदा पाण्यात गेला आहे. त्या खालोखाल १३७८ हेक्टरवरील आंबा तसेच १२९२ हेक्टरवरील द्राक्षपिके मातीमोल झाली आहेत. तसेच ७८५ हेक्टरवरील गहू, २१२ हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. याशिवाय अन्य फळपिके, वेलवर्गीय पिकेही तडाख्यात सापडली आहेत.

जिल्ह्यात नांदगाव, पेठ, निफाड, सटाणा, कळवण व चांदवड या तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. अवकाळीमुळे बाधित शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. बाधितांना मदतीसाठी १४ कोटी १० लाख २१ हजार रुपयांचा प्रस्ताव प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. त्यामुळे बाधितांच्या नजरा आता शासनाच्या मदतीकडे लागल्या आहेत.

अवकाळी-गारपिटीचे नुकसान

क्षेत्र             शेतकरी        क्षेत्र हेक्टर       निधी (लाखांत)

कोरडवाहू       42              21.01              1.79

बागायत      10473         4679.69           795.55

फळपिके      8475           2723.90          612.88

एकूण          18990         7424.60           1410.21

हेही वाचा :   

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT