नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा
मुंबई-आग्रा महामार्गावर गोंदेदुमाला एमआयडीसीसमोर बुधवारी (दि. 18) रात्री 11 च्या सुमारास रस्ता ओलांडणार्या बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात बिबट्या जागीच ठार झाला.
महामार्गावरील लिअर कंपनीच्या परिसरातून रस्ता ओलांडत असताना बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्या ठार झाला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल या घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला.
दरम्यान, महामार्गावर विविध कंपन्यांमध्ये रात्रीच्या वेळी कामावर जाणार्या येणार्या नागरिकांमध्ये मात्र या घटनेने बिबट्याची भीती पसरली आहे. अद्यापही काही बिबटे असल्याची शक्यता गृहीत धरून वन विभागाने कार्यवाही करण्याची मागणी होत आहे. या प्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस, वनपाल भाऊसाहेब राव, शैलेश झुटे, चालक मुज्यु शेख आदींनी मृत बिबट्याचा घटनास्थळावर पंचनामा करून पुढील प्रक्रियेसाठी उचलून नेले.