उत्तर महाराष्ट्र

नाशिक : पेठ रोडवर बस-ट्रक धडकेत ट्रकचालक ठार, बसचालकासह १४ प्रवासी जखमी

गणेश सोनवणे

नाशिक/पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

पेठ रोडवरील नाशिक महापालिकेच्या कमानीजवळ सिमेंट मिक्सर ट्रक आणि राज्य परिवहन महामंडळाच्या बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात मिक्सर ट्रकचालकाचा मृत्यू झाला. तर बसचालकासह १४ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळू एकनाथ बेंडकुळे (५८, रा.आशेवाडी) असे अपघातात ठार झालेल्या चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. २२) सायंकाळी ४ च्या सुमारास पेठ आगाराची (क्र. एमएच ४०, वाय ५९७६) बस पेठहून पुणे येथे जात होती. तर (क्र. एमएच ०४, ईबी ४४५२) क्रमांकाचा सिमेंट मिक्सर ट्रक पेठच्या दिशेने जात होता. नाशिक महानगरपालिकेच्या कमानीजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यात गंभीर मार लागल्याने ट्रकचालक बेंडकुळे यांचा मृत्यू झाला. तर बसचालक संतोष काळू सताळे, वाहक पी. के. अलबाड यांच्यासह इतर प्रवासी जखमी झाले. जखमींना तातडीने १०८ रुग्णवाहिका व बसमधून जिल्हा रुग्णालयात आणले. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या अपघातात सीताबाई यादव पवार, सचिन यादव पवार, वामन किसन महाले, महिंद्रा दिलीप वारे, हेमंत गोपीचंद्र खैरनार, विजय रामदास नाठे, अरुण बंडू लोखंडे, प्रदीप के. बोंबले, फैजान शेख, नईम खान, महेंद्र शिंगाडे, हरिदास जाधव, रमेश राऊत, कुसुम खंडू बोंबले हे प्रवासी जखमी झाले आहेत.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT