उत्तर महाराष्ट्र

नाशिक : पर्यटकांना ‘डोंगरच्या काळ्या मैना’ची भुरळ

अंजली राऊत

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा

सुरगाणा तालुक्यात डोंगरदरीतील करवंदांच्या जाळ्या रानमेव्याने फुलल्या असून, या डोंगरच्या काळ्या मैनेचे चिखली, घागबारी, गाळपाडा, चिराई-सापुतारा रस्त्यावर नागरिक विक्री करताना दिसून येत आहेत.

सापुतारा-वणी रस्त्यावर 'करवंद घ्या करवंद' अशी हाक ऐकू येऊ लागली आहे. आदिवासी भागातील महिला-पुरुष हातात डोणे घेऊन करवंद विक्री करताना दिसत आहेत. चटणी करता येते. चवीने आंबट-गोड हे फळ पित्तनाशक आहे. या आरोग्यवर्धक फळात 'क' जीवनसत्त्व व पोटॅशियम अधिक असल्याने ते हृदयविकारासाठी गुणकारी ठरते. करवंद सेवनाने रक्तदाब सुधारतो. खोकला, कर्करोग, मधुमेह, उष्णतेचे विकार, मूत्राशयाचे आजार, हाडांचे आजार आदींवर करवंद फळ उपायकारक असल्याची माहितीही विक्रेत्यांकडून देण्यात येत आहे. बोरगाव, चिखली परिसरातील महिला करवंद रानमेवा विक्री करून आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या पुढील वर्षांसाठी वह्या, कपडे, शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी तरतूद करून ठेवतात. कष्टाला हातभार लावत स्वावलंबनाचे धडे ते गिरवताना दिसतात. करवंदाची टोपली घेऊन ५० रुपये, पानाचे द्रोण तयार करून १० रुपयांपासून २० रुपयांपर्यंत वाटेही विक्रीसाठी ठेवले जातात. दिवसाकाठी अडीचशे ते तीनशे मिळत असतात, असेही विक्रेत्यांनी सांगितले. यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना रोजगारही उपलब्ध झाला आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT