उत्तर महाराष्ट्र

नाशिक : विहिरींत आढळले तीन मृतदेह, परिसरात खळबळ

गणेश सोनवणे

देवगाव/लासलगाव: (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
निफाड तालुक्यातील देवगाव शिवारातील पोटे वस्तीनजीक मंगळवारी (दि. 26) सकाळी पायल रमेश पोटे (19) हिचा मृतदेह विहिरीच्या पाण्यावर तरंगताना आढळून आला. याबाबत देवगावचे पोलिसपाटील सुनील बोचरे यांनी लासलगाव पोलिसांना कळविले असता, सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी सहायक पोलिस उपनिरीक्षक लहानू धोक्रट, संदीप शिंदे, औदुंबर मुरडनर यांच्यासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

मृत महिलेचे वैजापूर येथील नातेवाईक येईपर्यंत मृतदेह काढण्यास उपस्थितांनी विरोध केला. नातेवाईक आल्यानंतर मृतदेह काढण्यात आला. नातेवाइकांचा प्रचंड आक्रोश व संताप बघता, अधिक कुमक मागवून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिल्याने नातेवाइकांचे समाधान झाले.

शवविच्छेदनासाठी निफाड ग्रामीण रुग्णालयात मृतदेह पाठविण्यात आला. त्याचप्रमाणे पाण्यावर पुरुषाच्या चपला तरंगत असल्याने विहिरीत अजून कुणी आहे का? हे शोधण्यासाठी पाण्याचा उपसा करण्यात आला असता, दुपारी संदीप एकनाथ पोटे (27) यांचा मृतदेह गाळात फसलेल्या अवस्थेत आढळला. दरम्यान, दुसर्‍या घटनेत देवगाव परिसरातील कासली शिवारात दुपारी एका विहिरीनजीक दुचाकी, मोबाइल, चपला आढळल्या. विहिरीच्या पाण्याचा उपसा केला असता, त्यात प्रणित दत्तात्रेय बोचरे (22) या युवकाचा मृतदेह आढळला. या घटनांनी गावात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT