नाशिक (घोटी/ पिंपळगाव मोर) : पुढारी वृत्तसेवा
कावनई शिवारातील महिलेच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने वाहनधारक चोरट्यांनी दिवसाढवळ्या गळ्यातून खेचल्याची घटना रविवारी (दि. 29) दुपारी दीडच्या सुमारास घडली.
मुकणे येथील ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ राव व त्यांचे कुटुंबीय कावनई रोडवरील वाघोबावाडी व बळवंतवाडीकडे जाणार्या रस्त्यालगत शेतावर राहात आहे. तेथे त्यांचे किराणा दुकान आहे. रविवार दुपारी घरी कोणी नसल्यामुळे त्यांची आई अनुसयाबाई कचरू राव या दुकानात थांबल्या होत्या. याच दरम्यान दुपारी दीडच्या सुमारास दोन जण दुचाकीवरून आले व बिस्कीट पुडे घेण्याच्या बहाण्याने एकजण दुकानात आला व एकजण गाडीवरच थांबून राहिला होता. याचवेळी अनुसयाबाई यांच्या गळ्यातील दोन सोन्याच्या पोती (अंदाजे किंमत 2 लाख) गळ्यातून हिसकावून दोघांनीही गाडीवरून पलायन केले. त्यांनी आरडाओरडा केला, मात्र दुचाकीवरून दोघेही पसार झाले. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. श्रीक्षेत्र कावनई जवळच असल्याने या रस्त्यावर भाविकांची तसेच पर्यटकांची नेहमीच काहीशी वर्दळ असते. परिसरात महिलांच्या गळ्यातून सोने चोरीच्या घटना वाढत असून, घोटी पोलिसांनी याकडे लक्ष देऊन या घटनांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.