उत्तर महाराष्ट्र

Nashik : …तर झी स्टुडिओ फोडणार, स्वराज्य’ संघटनेचा इशारा

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

'हर हर महादेव' हा वादग्रस्त चित्रपट येत्या रविवारी (दि.१८) झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित केला जाणार असून, त्यास स्वराज्य संघटनेकडून विरोध कायम ठेवला आहे. स्वराज्य प्रमुख संभाजीराजे यांनी अगोदरच झी मराठी व्यवस्थापनाला पत्र लिहून चित्रपट प्रदर्शित न करण्याबाबत सांगितले होते. तसेच स्वराज्यचे पदाधिकारी अंकुश कदम, विनोद साबळे यांनी झी स्टुडिओला प्रत्यक्ष भेट देऊन चित्रपट प्रदर्शित करू नये, असे स्पष्ट केले होते. मात्र, अशातही चित्रपट प्रदर्शित केला जाण्याची शक्यता असल्याने झी मराठीच्या स्टुडिओची तोडफोड करणार असल्याचा इशारा स्वराज्य संघटनेने दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखविण्यात आल्याने, हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. या चित्रपटाला सर्वच स्तरांतून तीव्र विरोध झाला होता. अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शो बंद पाडले होते. दरम्यान, या चित्रपटातील काही वादग्रस्त भाग वगळून हा चित्रपट झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित केला जाणार असल्याचे व्यवस्थापनाने कळविल्यामुळे सवराज्य संघटनेचे पदाधिकारी आणखी आक्रमक झाले आहेत. चित्रपटातील काही भाग वगळला म्हणजेच या चित्रपटात चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखविण्यात आल्याची बाब तुम्हीच मान्य करीत आहात, त्यामुळे कोणत्याही परिस्थिती हा चित्रपट प्रदर्शित केला जाऊ नये, अशी भूमिका स्वराज्य संघटनेने घेतली आहे. तसेच चित्रपट प्रदर्शित केल्यास झी स्टुडिओची तोडफोड करणार असल्याचा इशाराही संघटनेकडून देण्यात आला आहे.

सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली शिवरायांच्या इतिहासाची मोडतोड आम्ही सहन करणार नाही. वारंवार सांगून समजत नसेल तर झी स्टुडिओ नक्की फोडणार.

– करण गायकर, प्रवक्ता, स्वराज्य संघटना

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT