उत्तर महाराष्ट्र

Nashik : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पर्यटनस्थळी गर्दी उसळली

गणेश सोनवणे

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

शहर आणि परिसरात चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धबधबे खळाळते झाले असून, पावसानंतर पहिल्याच रविवारी तालुक्यातील पहिनेबारीसह सर्वच पर्यटनस्थळांच्या ठिकाणी गर्दी उसळल्याचे चित्र दिसून आले.

पहिनेबारी परिसरात जाण्यासाठी नाशिक- त्र्यंबक रस्त्यावर असलेल्या पेगलवाडी फाटा येथे वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या रांगा थेट नाशिक रस्त्यावर पोहोचल्याने भाविकांच्या वाहनांना थांबावे लागले. पहिने घाट ते घोटी रस्ता या भागात जागोजागी पर्यटक थांबून नव्याने आलेल्या हिरवाईचा आनंद लुटताना दिसत होते. पहिने येथील नेकलेस धबधबा येथे जाण्यासाठी वनखात्याने 30 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यास प्रारंभ केला आहे. नेकलेस धबधबा व्यतिरिक्त नदीपात्रात अन्य इतरत्रदेखील पर्यटकांनी परिसर फुलला होता. मक्याचे कणीस, भजी चहा यांची तडाखेबंद विक्री झाली. दरम्यान, या भागात असलेले धाबे आणि खानावळीदेखील फुल्ल झालेल्या होत्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहने उभी करण्यात आली होती.

वाडीवऱ्हे पोलिसांचे दुर्लक्ष

पहिनेबारी आणि परिसर वाडीवऱ्हे पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात आहे. हजारो वाहने आणि प्रवासी या भागात आलेले असतात. त्यातील काही मद्यपान करून बेफाम वाहने चालवतात. आरडाओरडा करतात. आचकट विचकट बोलतात. खुल्या जागेत बसून मद्यपान करतात. अनेकदा आपापसात हाणामाऱ्या करतात, यामुळे कुटुंबासह आलेल्या पर्यटकांना नाहक वादाला सामोरे जावे लागते. यासाठी पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT