फ्लॅट्सचे दर www.pudhari.news  
उत्तर महाराष्ट्र

नाशिक : शहराच्या चहूबाजूने फ्लॅट्सचे दर भिडले गगनाला

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

घर हे माणसांच्या मूलभूत गरजांपैकी एक असून, स्वत:चे घर असावे असे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, 'बजेट' हा सर्वांच्याच जिकिरीचा विषय असल्याने, प्रत्येक जण परवडणाऱ्या फ्लॅटच्या शोधात असतो. मात्र, आता हा शोध घेणे खूपच अवघड होणार आहे. कारण शहराच्या चहूबाजूने फ्लॅट्चे दर गगनाला भिडले असून, 'बजेट फ्लॅट' ही संकल्पनाच जणू काही हद्दपार झाली आहे. बांधकाम साहित्यातील महागाई भाववाढीला कारणीभूत असल्याचे बिल्डर्सकडून सांगितले जात असले तरी, वाढते दर सर्वसामान्यांच्या घराच्या स्वप्नावर पाणी फेरणारे ठरत आहेत.

सध्या शहराच्या चहूबाजूने मोठमोठे बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. आगामी सणासुदीचा विचार करून हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. मात्र, फ्लॅटसच्या वाढत्या किमती चिंता वाढविणाऱ्या असून, घर घ्यावे की नाही? अशा द्विधा मनस्थितीत सर्वसामान्य वर्ग असल्याचे दिसून येत आहे. महत्त्वाची बाब शहराच्या सर्वच भागात किमती वाढविण्यात आल्याने, बजेटमधील घर ही संकल्पना नाममात्र राहिली आहे. पाथर्डी फाटा, मखमलाबाद, नाशिकरोड या भागात घर घेण्यास अनेकांकडून प्राधान्य दिले जायचे. विशेषत: पाथर्डी फाटा परिसरात ठाणे, मुंबई, पालघर या जिल्ह्यांतील लोक गुंतवणुकीला प्राधान्य द्यायचे. अशीच परिस्थिती आडगाव परिसराची असून, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातील लोक 'सेकंड होम' म्हणून या भागाला प्राधान्य द्यायचे. नाशिकरोड, जेलरोड, विहीतगाव हा भाग गुंतवणुकीसाठी निवडला जायचा. अर्थात कधीकाळी दर आवाक्यात असल्याने ही परिस्थिती होती. आता मात्र चित्र याच्या विपरीत असून, या भागात प्रकल्प उभारून हातोहात फ्लॅट्सची विक्री करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना आता पूर्ण प्रकल्प सेल करण्यासाठी दीड ते दोन वर्षांचा अवधी लागत आहे. फ्लॅट्सच्या वाढलेल्या किमतींमुळे ग्राहक वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत बघावयास मिळत आहे. असे असले तरी, पुढच्या काळात यापेक्षा किमती कमी होतील, अशी शक्यता तुरळक असल्याचे सांगितले जात आहे.

३५ लाखांच्या पुढेच रो-हाउस : सध्या शहराच्या चहूबाजूने रो-हाउसचे प्रकल्प उभारले जात आहेत. मात्र, कमीत कमी ३५ लाख रुपयांच्या पुढेच रो-हाउसच्या किमती असल्याचे सांगितले जात आहे. सध्या शहर व परिसरात रो-हाउसला मागणी वाढल्याने, जागोजागी रो-हाउसचे प्रकल्प साकारले जात आहेत. मात्र, या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने रो-हाउस खरेदी करणे अनेकांचे स्वप्नच राहत आहे.

प्लॉट्सचे दरही अधिक : शहर व परिसरात एन ए प्लाॅट्सचे अनेक प्रकल्प उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, याठिकाणी कमीत कमी २१०० रुपये वार अशा किमती असल्याने एक गुंठा जागेसाठी किमान २५ लाख रुपये मोजावे लागत आहेत. पुढच्या काळात या किमती आणखी वाढणार असल्याने, ग्राहकांच्या चिंतेत भरच पडत आहे.

सर्व दर स्क्वेअर फुटामध्ये सरासरी पद्धतीने दर्शविण्यात आलेले दर असे…

मखमलाबाद – ३ ते ३.५ हजार

आडगाव – ३.८ ते ४.२ हजार

पंचवटी – ४ ते ४.५ हजार

मेरी-म्हसरूळ – ४.५ ते ५ हजार

जेलरोड – ४.२ ते ४.५ हजार

सिन्नर फाटा – ३.२ ते ३.६ हजार

देवळाली – २.५ ते २.७ हजार

विहीतगाव – ३ ते ३.५ हजार

पाथर्डी फाटा – ३.५ ते ३.७ हजार

अंबड – ३.२ ते ३.६ हजार

सातपूर – ३ ते ३.५ हजार

गंगापूर रोड – ५ ते ५.५ हजार

कॉलेजरोड – ९ ते ९.५ हजार

सिरीन मेडोज – ४.५ ते ५ हजार

पंडित कॉलनी – ७ ते ७.५ हजार

गोविंदनगर – ५.५ ते ६ हजार

इंदिरानगर – ४.५ ते ५ हजार

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT