उत्तर महाराष्ट्र

‘शिवशाही’चा प्रवास ठरतोय जीवघेणा, नाशिकमध्ये अपघातांची मालिका सुरूच

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
'प्रवाशांच्या सेवेसाठी' असे ब्रीदवाक्य मिरविणार्‍या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 2016 मध्ये मोठा गाजावाजा करत 'शिवशाही' बससेवा सुरू केली. मात्र, गेल्या सात वर्षांमध्ये झालेले शिवशाही बसच्या अपघाताचे प्रमाण चिंताजनक आहे. अप्रशिक्षित चालक आणि तांत्रिकदृष्ट्या दुय्यम दर्जाच्या बसेसमुळे शिवशाहीचा प्रवास जीवघेणा ठरत आहे. अपघातांची मालिका सुरूच असल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

नाशिक-पुणे महामार्गावर गेल्या आठवड्याभरात शिवशाही बसचे तीन अपघात झाले असून, सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. कधी गाडीच्या इंजिनमधून धूर येऊन गाडीला आग लागणे, रस्त्यात वारंवार गाडी बंद पडणे, वारंवार ब्रेक निकामी झाल्याने जीवघेणे अपघात होणे असे प्रकार घडू लागले आहेत. वारंवार होणार्‍या अपघातांमुळे शिवशाही बसच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाढत्या अपघाताने शिवशाहीचा प्रवास असुरक्षित मानला जात आहे.

आधुनिक तंत्रज्ञानावर चालणार्‍या शिवशाही बसेस सुरुवातीला एसटी महामंडळाच्या चालकांसाठी पूर्णपणे नवीन होत्या. त्यासाठी एसटीचालकांना सुमारे 45 ते 60 दिवस प्रशिक्षण देण्यात आले होते. मात्र, खासगी शिवशाहीच्या चालकांना असे कोणतेही प्रशिक्षण देण्यात आले नाही. याचा थेट परिणाम प्रवाशांच्या सुरक्षेवर झाला. राज्यभरात शिवशाहीचे एकामागोमाग एक अपघात सुरू झाले. अपघातामुळे नादुरुस्त गाड्या बंद राहण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवशाहीचा प्रवास असुरक्षित बनल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे.

सुविधांची कमतरता
एसटी महामंडळाकडून शिवशाहीमध्ये पुशबॅक आसने, मोबाइल चार्जर, वातानुकूलन यंत्रणा, एलईडी स्क्रीन, सीसीटीव्ही कॅमेरा, वाय-फाय अशा अनेक सुविधा असतील, असे सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात बहुतांश गाड्यांमध्ये मोबाइल चार्जर न चालणे, घाटात बंद पडणारी सदोष वातानुकूलन यंत्रणा, अस्वच्छता अशी परिस्थिती असते. प्रवाशांना असुविधा असतानाही केवळ गरजेपोटी शिवशाहीतून प्रवास करावा लागतो.

नाशिक-पुणे महामार्गावरील झालेल्या शिवशाही बसच्या तिन्ही अपघातांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. शिवशाहीचे वाढते अपघात रोखण्यासाठी बसेस सुस्थितीत ठेवण्याच्या सूचना सर्वच आगारप्रमुखांना तर खासगी शिवशाही पुरविणार्‍या ठेकेदारांनाही आवश्यक काळजी घेण्याची सूचना दिली आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
– अरुण सिया, विभागीय नियंत्रक,
एसटी महामंडळ, नाशिक

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT