उत्तर महाराष्ट्र

नाशिक : शहरासाठी वरदान ठरणार्‍या पाणीपुरवठा योजनेचे येत्या 13 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

अंजली राऊत

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा
शहरासाठी वरदान ठरणार्‍या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन दि. 13 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाला उद्योगमंत्री उदय सावंत, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री दादा भुसे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आमदार सुहास कांदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आ. कांदे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत मनमाडच्या जनतेला पाणी समस्या कायमस्वरूपी सोडवण्याचे वचन दिले होते, ते पूर्ण होत असल्याचे समाधान वाटत आहे. करंजवण योजनेच्या कामाला सुरुवात झाली असून, सुमारे 12 किमीहून अधिक काम झाले आहे. ही योजना वेळेवर पूर्ण होणार असल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच औद्योगिक वसाहतीचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. शहरालगत पावणेआठशे एकरांवर 'एमआयडीसी' उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात प्रस्तावास उद्योग मंत्रालयाने मंजूर दिली आहे. मनमाडला रेल्वे जंक्शन असूनही पाणीटंचाईमुळे येथे मोठे प्रकल्प उभे राहिले नाहीत. सर्व समस्यांचे मूळ पाणीटंचाई होती. आता समस्या मार्गी लागल्याने एमआयडीसीचा मार्गदेखील मोकळा झाला आहे. त्यासाठी येवला रस्त्यावरील वंजारवाडी शिवारात एकूण 775 एकरांवर ही वसाहत उभी राहणार आहे. त्यामुळे रोजगारनिर्मिती होऊ शकेल. सर्वसामान्यांसाठी दोन फिरते दवाखाने, दोन फिरते शासकीय कार्यालये सुरू केली जाणार आहेत. त्यासाठी वाहने सज्ज असल्याचेही ते म्हणाले. नगर परिषदेची जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत उभारली जाणार आहे. स्टेडियमच्या उर्वरित कामासाठी पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. महापुरुषांच्या पुतळ्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहेत. तसेच नांदगावला शिवसृष्टी उभारली जाणार असून, त्यासाठी 25 कोटींचा निधी मिळणार आहे. तसेच अगामी काळात नांदगाव शहरासोबतच तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी आ. कांदे यांनी दिली. यावेळी शहरप्रमुख मयूर बोरसे, माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे, सुनील हांडगे, संगीता बागूल, जगताप यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन साईनाथ गिडगे, मयूर बोरसे यांनी केले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT