देवळा; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील लोहोणेर गिरणा नदी पात्रात रविवारी (दि. ९) सकाळी सहा वाजेच्या सुमारास अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या घटनेची देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या नदीपात्रात वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत आहेत, त्यामुळे पुलावर संरक्षण जाळी बसविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवारी सकाळी लोहोणेर येथील मॉर्निंग वॉकसाठी फिरायला जाणाऱ्या लोकांना गिरणा नदीत पाण्यात तरंगताना एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह दिसला. याची माहिती त्यांनी गावातील सामाजिक कार्यकर्त्यांना दिली. यानंतर पोलीस पाटील अरविंद उशिरे यांनी देवळा पोलिस ठाण्यात घटनेची खबर दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे, विनय देवरे, कोरडे आदींनी घटनास्थळी दाखल होऊन स्थानिक पोहणारे दादू साप्ते, विशाल गरुड, नानू पवार यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे आदी करीत आहेत.
हेही वाचा :