उत्तर महाराष्ट्र

नाशिक : थकबाकीदार झळकणार आता फ्लेक्सवर, वसुलीसाठी जिल्हा बॅंकेचे पाऊल

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

थकबाकीच्या कारणाने आर्थिक अडचणीत आलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने आता थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी नवे पाऊल उचलले आहे. यामध्ये दहा लाखांहून अधिक थकबाकीदार असलेल्यांची नावे आता सार्वजनिक ठिकाणी फ्लेक्सद्वारे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे सार्वजनिकरीत्या ही नावे प्रकाशित होणार आहेत.

दरम्यान, जिल्हा बँकेने हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणाऱ्या थकबाकीदारांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार, ६७ बड्या थकबाकीदारांची यादी गेल्या महिन्यात प्रसिद्ध करण्यात आली होती. ही यादी प्रसिद्ध होऊनदेखील दहा लाखांवरील थकबाकीदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने जिल्हा बँकेने आता या थकबाकीदांचे फ्लेक्स सार्वजनिक ठिकाणी लावण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्हा बँकेचे जिल्ह्यातील ५५ हजार ७३७ थकबाकीदार सभासदांकडे २ हजार ३६५ कोटींचे (मुद्दल +व्याज) कर्ज थकविल्यामुळे बँक आर्थिक अडचणीत सापडली आहे. यंदाच्या वसुली हंगामात जास्तीत जास्त थकीत कर्जवसुली होण्याकामी व बँकेच्या खातेदारांना ठेवींची/खात्यावरील बचतीची रक्कम उपलब्धता होण्यासाठी बँकेने वसुलीसाठी कडक पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणाऱ्या थकबाकीदारांवर कर्जवसुलीसाठी कार्यवाही सुरू केली आहे.

यादी प्रसिद्ध केल्यानंतर थकबाकीदारांकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नसल्याने धडक वसुली मोहिमेंतर्गत या बड्या थकबाकीदारांच्या नावाचा फलक गावोगावी लावला जाणार आहे. त्यानंतर, गावागावांत दवंडी फिरविण्याचीदेखील तयारी बँक प्रशासनाने केली आहे. बँकेचे आरबीआयचे लायसेन्स अबाधित ठेवण्यासाठी हा कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यामुळे बँकेला नाइलाजाने कार्यवाही करावी लागत आहे. यासाठी थकबाकी भरावी, असे आवाहन बँक प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT