उत्तर महाराष्ट्र

Nashik : क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कारवाई करा-छगन भुजबळ

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक येथे खासगी ट्रॅव्हल बस अपघातात १२ प्रवाशांना जीव गमवावा लागला. तसेच यामध्ये ४१ प्रवासी जखमी झाले. सरकारने या घटनेची सखोल चौकशी करून ३० प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी असताना ५२ प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच अपघातात मृत व जखमी व्यक्तींना शासनाने जाहीर केलेली मदत तातडीने देण्यात यावी, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे केली.

लक्षवेधी सूचना मांडताना छगन भुजबळ म्हणाले की, आठ ऑक्टोबरला नाशिकला खासगी ट्रॅव्हल बस व आयशर ट्रक यांच्यात अपघात होऊन खासगी ट्रॅव्हल बस पेटल्यामुळे १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला, तर ४१ प्रवासी जखमी झाले होते. या अपघाताची चौकशी करून अपघाताची कारणे निश्चित करण्याची आवश्यकता आहे. या अपघातग्रस्तांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या वारसांना ५ लाख, तर जखमींना २ लाखांची मदत जाहीर केलेली होती. तसेच पंतप्रधान निधीमधूनही २ लाखांची घोषणा केंद्राकडून करण्यात आलेली होती. मात्र, मृतांच्या वारसांना व जखमींना अद्याप शासनाकडून मदत मिळाली नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे शासनाने जाहीर केलेली शासकीय मदत वितरित झाली नसेल तर ती देण्यात यावी.

घटनेची सखोल चौकशी करून अपघात होऊ नये म्हणून शासनाने उपाययोजना करण्याची आवश्यकता असून, शासनाने तातडीने कार्यवाही करावी. केवळ चालकावर कारवाई न करता क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी ट्रॅव्हलसवर कारवाई करा, अशी मागणी भुजबळ यांनी सभागृहात केली.

उत्तरात मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले, अपघात प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अधिक चौकशी करून दोषी आढळल्यास खासगी ट्रॅव्हल्सच्या मालकावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल. मृत व जखमी व्यक्तींना शासनाने जाहीर केलेली मदत देण्यात आलेली आहे. मदत मिळालेली नसल्यास तातडीने वितरित केली जाईल. नाशिक-मुंबई व नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिस पेट्रोलिंग आणि योग्य ती उपाययोजना केली जाईल.

वाहतूक कोंडी सोडवा

नाशिक-मुंबई रस्त्यावर ठाणे ते पडघादरम्यान कंटेनरमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असल्याने मुंबई-नाशिक प्रवासात पाच तासांहून अधिक वेळ लागत आहे. यासाठी येथे पोलिसांकडून वाहतुकीचे नियोजन करण्यात यावे. तसेच नाशिक-पुणे महामार्गावरील देखील वाहतुकीची कोंडी सोडविण्याची मागणी भुजबळ यांनी केली.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT