उत्तर महाराष्ट्र

Nashik : पांजरापोळमधील झाडे, जनावरे पशु-पक्ष्यांचे आज सर्वेक्षण

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सारूळ, चुंचाळे येथील पांजरापोळ जागेवरील झाडे, पाळीव पशु, पक्षी, जनावरे व जलसिंचनाच्या साधनांचे गुरुवारी (दि.२७) विविध विभागांकडून सर्वेक्षण केले जाणार आहे. बुधवारी (दि.२६) जिल्हाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्वेक्षणानंतर अहवाल सादर केला जाणार आहे.

पांजरापोळची ८२५ एकर जागा उद्योगांसाठी उपलब्ध करून दिली जावी, अशी मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी विधिमंडळात केल्यानंतर या जागेवरून उद्योजक आणि पर्यावरणप्रेमी पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. पांजरापोळ येथील वनसंपदा नाशिकची 'ऑक्सिजन फॅक्टरी' असून, या ठिकाणी उद्योग उभारले जाऊ नये, अशी भूमिका पर्यावरणप्रेमींनी घेतली आहे. तर उद्योगांसाठी ही जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी उद्योजकांकडून केली जात आहे. दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबत बैठक घेऊन जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांना या जागेवरील वनसंपदा तसेच पशु-पक्ष्यां चा १५ दिवसांत पाहणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अशी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या माध्यमातून या जागेशी संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना गुरुवारी (दि.२७) जागेचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, पशुसंवर्धनचे उपसंचालक, सहायक उपमुख्य वनसंरक्षक, लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, वनपरिक्षेत्र अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केले जाणार आहे. तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी पांजरापोळ विश्वस्तांनादेखील प्रत्यक्ष हजर राहण्याचे पत्र पाठविले आहे. त्याचबरोबर मंडळ अधिकारी, तलाठी यांनाही याबाबतची माहिती देण्यात आली आहे. या सर्वेक्षणानंतर अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

उद्योगमंत्र्यांचा दौरा अन् सर्वेक्षण

मंगळवारी (दि.२५) उद्योगमंत्री उदय सामंत नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. मात्र, पांजरापोळवर ठोस भूमिका घेताना ते दिसून आले नाहीत. मात्र, दुसऱ्याच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना पांजरापोळ मालमत्तेचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिल्याने, उद्योगमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडल्याची चर्चा यानिमित्त रंगत आहे. आता नाशिककरांना या सर्वेक्षण अहवालाची आतुरता लागली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT