मालेगाव : शहरातील नव्या बसस्थानकातील फलाटावर बसेस ये-जा करू लागल्याने प्रवाशांची गर्दीही होऊ लागली आहे. 
उत्तर महाराष्ट्र

नाशिक : उद्यापासून एसटीच्या ग्रामफेर्‍या ; 298 कर्मचारी सेवेवर दाखल

अंजली राऊत

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा : राज्य परिवहन महामंडळ राज्य शासनामध्ये विलीन करावे, या मागणीसाठी दिवाळीपासून पुकारण्यात आलेल्या संपाची धार उच्च न्यायालयाचा आदेश आणि सिल्व्हर ओक प्रकरणानंतर कमी झाली आहे. न्यायालयाने 15 एप्रिलपर्यंत कामावर या अन्यथा एसटी महामंडळ कारवाई करू शकते, असा निर्णय दिला होता. त्यानुसार अनेक कर्मचारी कामावर रुजू झाल्याने एसटी धावू लागली आहे. मालेगाव आगारातील 417 पैकी 298 कर्मचारी सेवेवर दाखल झाले असून, येत्या 22 तारखेपासून ग्रामीण भागातील फेर्‍या पूर्ववत सुरू करण्याचे नियोजन झाले आहे.

कोरोना काळात बंद पडलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्बंध शिथिल होऊन पूर्ववत झाली. परंतु, गतवर्षी ऐन दिवळीच्या तोंडावर एसटी कर्मचारी संघटनांनी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणासह विविध मागण्यांसाठी संप पुकारला. शासनस्तरावरून बोलणीच्या फेर्‍या फिस्कटल्यानंतर संप चिघळला. शासनाने विलीनीकरणाची मागणी वगळता काही मागण्या मान्य केल्या. 41 टक्के पगारवाढ दिली. परंतु, विलीनीकरणाच्या मुद्द्यावर संघटना कायम राहिल्या. तेव्हा शासनाने त्रिसदस्यीय समिती गठीत केली. या समितीने विलीनीकरण शक्य नसल्याचा अहवाल दिल्यावर परिवहनमंत्री अनिल परब यांनी, संपकाळात झालेले निलंबन, नोटिसा मागे घेण्यात येतील, तरी 10 मार्च 2022 पर्यंत संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. त्यासही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर मुंबई उच्च न्यायालयानेच 15 एप्रिलपर्यंत कामावर या अन्यथा महामंडळ कारवाई करू शकते, असा निर्णय दिला. तो अनेकांनी मान्य केला. या दरम्यानच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानावर गोंधळ झाला अन् निर्माण परिस्थितीत अनेकांचा संघर्ष थांबला. परिणामी, आता एसटी रस्त्यावर धावू लागली आहे.

70 टक्के फेर्‍या सुरू – मालेगाव आगारात एकूण 417 कर्मचारी आहेत. त्यापैकी आजघडीला 298 सेवक पुन्हा कामावर रुजू झाले. त्यामुळे पूर्वापार नियोजनाच्या 70 टक्के फेर्‍या सुरू झाल्या आहेत. यात प्रामुख्याने शहरी भागाच्याच फेर्‍या होत आहेत. एक-दोन दिवसांत अजूनही काही कर्मचारी कामावर येण्याची शक्यता असून, त्याआधारे 22 एप्रिलपासून ग्रामीण भागातील फेर्‍याही पूर्ववत करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती आगारप्रमुख धनवटे यांनी दिली.

चैत्रोत्सव लाभला – सप्तशृंगगडावर होणारा चैत्रोत्सव नेहमीच एसटी महामंडळाला लाभदायी ठरतो. यंदा संपामुळे उत्पन्नावर पाणी फिरते की काय, अशी स्थिती असताना रुजू मनुष्यबळाचे नियोजन यशस्वी झाले. उत्सव काळात वणी गडावर 322 फेर्‍या होऊन आगाराला आठ लाख 75 हजार 964 रुपयांचे उत्पन्न मिळाले. एकूण 11 हजार 729 प्रवाशांनी सेवा घेतली.

आगारातील सद्यस्थिती (कंसात हजर कर्मचारी) : चालक 186 (139), वाहक 133 (102), वर्कशॉप 60 (55), क्लेरिकल 38 (2)

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT