उत्तर महाराष्ट्र

नाशिक : जिल्ह्यात आजपासून स्टार्टअप-नावीन्यता यात्रा

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीच्या माध्यमातून राज्यामध्ये स्टार्टअपच्या विकासासाठी पोषक वातावरणनिर्मिती करून त्यातून यशस्वी उ्द्योजक घडविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप व नावीन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, ही यात्रा सोमवार (दि. २२) पासून नाशिक जिल्ह्यामध्ये येणार आहे.

महाराष्ट्र स्टार्टअप व नावीन्यता यात्रेच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात तालुकास्तरीय प्रचार प्रसिद्धी व जनजागृती अभियान दि. २२ ते २७ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यात्रेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी एका वाहनातून संपूर्ण माहिती, नावीन्यपूर्ण संकल्पना व त्याचे इतर पैलू तसेच विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली जाणार आहे. जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर, सादरीकरण सत्र व राज्यस्तरीय अंतिम सादरीकरण सत्र व विजेत्यांची घोषणा हे यात्रेचे प्रमुख टप्पे आहेत. सोमवारी (दि. २२) बागलाण (सटाणा) तालुक्यातील मविप्र औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, सोनवणे महाविद्यालय, मार्केट कमिटी, मंगळवारी (दि. २३) देवळा तालुक्यातील एनसीव्हीटी आयटीआय, के. आर. ए. महाविद्यालय, कळवण तालुक्यातील आयटीआय (आदिवासी), एसपी पब्लिक स्कूल, आरकेएम इंग्लिश स्कूल तसेच सुरगाणा तालुक्यातील आयटीआय (आदिवासी), महात्मा गांधी महाविद्यालय यासाठी यात्रेंतर्गत कार्यक्रम होणार आहेत. बुधवारी (दि. २४) पेठ तालुक्यातील आयटीआय (आदिवासी), दादासाहेब बिडकर महाविद्यालय येथे यात्रेचे आगमन होणार आहे.

नावीन्यपूर्ण कल्पनांना पाठबळ : महाराष्ट्राच्या तळागाळातील नवउद्योजकांचा आणि नावीन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेऊन त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करून देणे, नवसंकल्पनांना तसेच सुरुवातीच्या टप्प्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ज्ञ मार्गदर्शन, निधी आणि आवश्यक पाठबळ पुरवणे, राज्यातील उद्योजकता व नावीन्यपूर्ण परिसंस्था बळकट करणे, या उद्देशाने महाराष्ट्र स्टार्टअप व नावीन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT