उत्तर महाराष्ट्र

नाशिक : सोयाबीनमध्ये आठवड्यात 700 रुपयांची झाली घसरण

अंजली राऊत

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा
केंद्र सरकारने सोयाबीन पेंढीस आयातीची परवानगी दिली होती. त्यातच आता खाद्यतेलावरील आयात शुल्क हटविल्याने तीन दिवसांपासून सोयाबीनच्या दरात घसरण सुरू आहे. मंगळवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला कमीत कमी चार हजार रुपये जास्तीत जास्त 6,552 तर सरासरी 6,400 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. एकाच आठवड्यात 700 रुपयांची घसरण झाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

गेल्या वर्षी सोयाबीनला 10 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाल्याने शेतकर्‍यांनी यंदा दर वाढतील या आशेने सोयाबीन विक्रीची घाई केली नाही. टप्प्याटप्प्याने विक्री करीत होते. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झाली नाही. दरम्यान ,रशिया व युक्रेनमध्ये तीन महिन्यांपासून युद्ध सुरू असल्याने या दोन्ही देशांतून सूर्यफूल व तेलाची आयात बंद होती. इंडोनेशियाने पामतेलाची निर्यातबंदी केली होती. त्यामुळे खाद्यतेलाच्या दरात वाढ होत असल्याने सोयाबीनचे दर तीन महिने सात हजारच्यावर होते. आता हंगाम संपल्यामुळे सोयाबीनच्या दरात वाढ होईल, या अपेक्षेने व खरीप पेरणीसाठी बी-बियाणे, खतांसाठी होणार्‍या खर्चाची तजवीज म्हणून शेतकर्‍यांनी सोयाबीनची साठवणूक केली होती. दरम्यान, केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी सोया पेंढीच्या आयातीस परवानगी दिली. त्यामुळे सोयाबीनच्या दरात घसरण होऊन सहा हजारांपर्यंत खाली उतरले होते. आता इंडोनेशियानेही पामतेल निर्यातीला परवानगी दिली. सरकारने खाद्यतेलाच्या दरात होणारी वाढ थांबावी म्हणून 20 लाख मेट्रिक टन सोयाबीन तेल व 20 लाख मे. टन सूर्यफूल तेल आयातशुल्क येत्या मार्चपर्यंत माफ करून आयातीस परवानगी दिली. केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्क पूर्णपणे काढल्याने तीन दिवसांत सोयाबीनच्या दरात 700 रुपयांची घसरण झाली आहे. येणार्‍या काळात हीच परिस्थिती राहील असा व्यापार्‍यांचा अंदाज आहे. दरम्यान, सोयाबीनची साठवणूक केलेले शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

व्यापार्‍यांकडून गरजेनुसार खरेदी
सोयाबीनचे दर हंगामात चढेच राहिल्याने प्रक्रियादार कारखानदारांनी सोयाबीनची खरेदी गरजेनुसार केली. अगोदर केंद्र सरकारने सोयाबीनच्या पेंडीला आयात करण्याची परवानगी दिली. आता सोयाबीन व सूर्यफूल तेल आयात करण्यासाठी त्यावर आकारण्यात येणारे आयात शुल्क मार्चपर्यंत पूर्णपणे माफ केल्याने खाद्यतेलाच्या किमती कमी होत आहेत. त्यामुळे सोयाबीनच्या दरात घट होत आहे, असे येथील भुसार मालाचे व्यापार्‍यांनी सांगितले आहे.

सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी या अंतिम टप्प्यात विक्रमी दर मिळेल, असा विश्वास शेतकर्‍यांना होता. त्यामुळेच अनेकांनी सोयाबीनची साठवणूकही केली आहे. मात्र केंद्र सरकारने सोयातेल, सूर्यफूल तेल आयात करून त्यावरील शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतल्याने दिवसेंदिवस देशांतर्गत सोयाबीनचे दर मोठ्या प्रमाणात खाली आले आहेत. दहा हजार रुपये क्विंटल विकले जाणारे सोयाबीन आज सहा हजार रुपयांवर आले आहे. यात सामान्य शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान होत आहे. सरकारने आयात-निर्यात धोरण ठरवताना देशातील शेतकर्‍यांच्या परिस्थितीचा आणि फायद्याचा विचार करणे आवश्यक आहे. – सचिन होळकर, कृषितज्ज्ञ, लासलगाव.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT