नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
मालेगाव शहर व तालुक्यात काही भागात मंगळवारी (दि.27) दुपारुन मुसळधार पाऊस झाला. सकाळीपासून ढगाळ वातावरणात आणि उकाड्याने हैराण नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला तर शेतकर्यांना पेरणीचे वेध लागले. दरम्यान, तालुक्यातील लुल्ले येथे वीज कोसळून सहा शेळ्या ठार झाल्याचे वृत्त आहे. शनिवारी (दि.24) मालेगावसह कौळाणे नि., जळगाव निं., सौंदाणे, सायने, निमगाव या मंडळात हंगामातील पहिला दमदार पाऊस झाला होता. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. तिसर्या दिवशी मंगळवारी पुन्हा ढगांची गर्दी होऊन ठिकठिकाणी पर्जन्यवृष्टी झाली. तालुक्यात आतापर्यंत सरासरी 26 टक्के पाऊस झाला आहे. मंगळवारी दुपारी झालेल्या पावसात लुल्लेत वीज कोसळल्याची घटना घडली. त्यात देविदास विष्णू चव्हाण यांच्या सहा शेळ्या जागीच ठार झाल्या. तलाठ्यांनी प्राथमिक पंचनामा केला आहे.