उत्तर महाराष्ट्र

नाशिक : ‘अमृत’चे नाशिकहून पुण्याला स्थलांतर: अधिवेशनात माजी पालकमंत्री छगन भुजबळ प्रश्न उपस्थित करणार

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवक-युवतींना व इतर उमेदवारांसाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी म्हणजेच 'अमृत' या संस्थेची निर्मिती केली आहे. महाविकास आघाडी सरकारने या संस्थेचे मुख्यालय नाशिकला मंजूर केले होते. मात्र, शिंदे सरकारने नाशिकचे मुख्यालय पुण्याला स्थलांतरित केल्याने माजी पालकमंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत. त्यांनी, 'अमृत'चे मुख्यालय नाशिकहून पुण्याला नेण्याचे कारणच काय? असा सवाल उपस्थित करीत हा प्रश्न अधिवेशनात मांडणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

येवला तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित परिसराची पाहणी छगन भुजबळ यांनी शनिवारी (दि. १३) केली. या दरम्यान भुजबळ यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. नाशिक येथे मंजूर करण्यात आलेले 'अमृत' संस्थेचे मुख्यालय हे नवीन सरकार स्थापन होताच पुण्याला हलविण्यात आले, याबाबत विचारले असता, भुजबळ म्हणाले की, नव्याने सरकार स्थापन होताच नाशिकचे प्रकल्प पळविण्याचा हा सिलसिला पुन्हा एकदा सुरू झाला असून, आता खऱ्या अर्थाने नाशिकची प्रगती सुरू झाली आहे, असा उपहासात्मक टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. तसेच नाशिकमध्ये 'अमृत'चे मुख्यालय मंजूर करण्यात आले असताना, ते पुण्याला हलविण्याचे कारणच काय, असा सवाल उपस्थित करीत, येत्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करीत, यामागे सरकारची भूमिका काय, याबाबत विचारणा केली जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नाशिकचे प्रकल्प पळविण्याचा चंगच बांधला : नाशिकसाठी आम्ही जे काय करतो, ते पळवण्याचा जणू चंगच बांधलेला दिसतो आहे. या अगोदरदेखील नाशिकचे वनविभागाचे मुख्य कार्यालय, महावितरणचे कार्यालय, नाशिकच्या बोटी तसेच अनेक कार्यालये पळविण्याचा प्रयत्न गेल्या भाजपच्या सरकारमध्ये झाला. आता पुन्हा 'अमृत'चे कार्यालय पळविण्यात आले. नाशिककरांची मते लागतात, महापालिकेत सत्ता लागते, उमेदवार लागतात, त्यासाठी मीटिंग नाशिकमध्ये घेतल्या जातात आणि त्याच नशिककरांसाठी आणलेले प्रकल्प पळवण्यात येतात, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT