उत्तर महाराष्ट्र

नाशिक : सुसज्ज वंदे भारत रेल्वेला सत्तर टक्केच प्रतिसाद

अंजली राऊत

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरू केलेल्या मुंबई-शिर्डी वंदे भारत या सुसज्ज व वेगवान प्रवासी रेल्वेगाडीला 70 टक्के प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांनी 100 टक्के प्रतिसाद देऊन रेल्वेला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन रेल्वेने केले आहे.

रेल्वेचे भुसावळ विभागाचे सहायक वाणिज्य व्यवस्थापक अनिल बागले यांनी नाशिकरोड रेल्वेस्थानकातील कक्षात याबाबत पत्रकारांशी संवाद साधला. स्टेशन मास्तर आर. के. कुठार उपस्थित होते. अनिल बागले म्हणाले की, 10 फेब्रुवारीला मुंबई येथून पंतप्रधानांनी मुंबई – शिर्डी आणि मुंबई – सोलापूर वंदे भारत या दोन ट्रेनना हिरवा झेंडा दाखवला. या घटनेला आठवडा झाल्यानंतर रेल्वेच्या अधिकार्‍यांनी गाडीला मिळणार्‍या प्रतिसादाचा आढावा घेतला असता तो निराशाजनक आढळला. 18 फेब्रुवारीला मुंबई – शिर्डी वंदे भारत गाडीला 76.73 टक्के, तर शिर्डी – मुंबई वंदे भारत गाडीला 76.86 टक्के प्रतिसाद मिळाला. त्या आधीच्या फेर्‍यांमध्ये या पेक्षा कमी प्रवासी लाभले. हा प्रतिसाद अपेक्षेप्रमाणे 100 टक्के नसल्याचे आढळले. या गाडीत चेअर आणि एक्झिक्युटिव्ह कार अशा दोन श्रेणी आहेत. ही गाडी मुंबई – शिर्डी हे 343 किलोमीटर अंतर फक्त 5 तास 25 मिनिटांत पार करते. इतर गाड्यांपेक्षा ती किमान एक तास आधी पोहोचते. दादर, ठाणे, नाशिक येथे गाडीला थांबे आहेत. गाडीत अत्याधुनिक सेवा सुविधा आहेत. गाडीचे तिकीट दर हे सामान्यांना न परवडणारे असल्याने प्रतिसाद कमी आहे की, अन्य काही कारणांमुळे गाडीला प्रतिसाद कमी आहे, याबाबत रेल्वे माहिती घेत आहे. महत्त्वाचे जंक्शन असलेल्या मनमाडला या गाडीला थांबा नाही. तो सुरू झाल्यास खानदेश व अन्य राज्यांमधून मनमाडला येणार्‍या प्रवांशाची सोय होईल तसेच रेल्वेचा महसूल वाढेल अशी सूचना आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनीही तशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र, थांबे वाढविले, तर गाडी वेळेत पोहोचणार नाही. याबाबत रेल्वे बोर्डाला पत्र पाठविण्यात आले आहे. ही गाडी पुढे औरंगाबादपर्यंत नेली, तर उद्योजक, व्यावसायिकांचा प्रतिसाद वाढेल अशी सूचना आहे. गाडी संध्याकाळी शिर्डीला पोहोचते. त्यामुळे पहाटेच्या आरतीसाठी हॉटेलमध्ये मुक्काम करावा लागल्याने प्रवाशांचा खर्च वाढतो. गाडीची वेळ बदलून सकाळची केली, तर पंचवटी एक्स्प्रेसवरील लोडही कमी होईल तसेच वंदे भारतला प्रतिसादही वाढेल, अशीही सूचना आहे. अनिल बागले म्हणाले की, मुंबई-शिर्डी खासगी प्रवासी बसच्या भाड्यापेक्षा कमी दरात आणि सुरक्षित, आराम देणारा, वेळ वाचवणारा असा वंदे भारत ट्रेनचा प्रवास आहे. प्रवासी बसचालक वेगात गाडी चालवून प्रवाशांच्या जिवाशी खेळतात. त्याचा विचार करता रेल्वे अत्यंत सुरक्षित आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT