सिन्नर: पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील मेंढी शिवारात रात्रीच्या अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने मोटारसायकलस्वारांवर हल्ला केल्याची घटना गुरुवारी (दि. ८) रात्री ११.३० च्या सुमारास दुसऱ्यांदा घडली. त्यामुळे रात्री-अपरात्री प्रवास करणाऱ्यांसह परिसरातील शेतकऱ्यांमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे.
ऋषिकेश प्रकाश गिते (२३), सूरज संजय गिते (२४) हे दोघे गुरुवारी रात्री ११ ते ११.३० च्या सुमारास मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील कारखान्यातून दुसऱ्या पाळीतील काम संपवून मोटारसायकलने घरी येत असताना वाल्मीक लक्ष्मण गिते व अशोक जयराम गिते यांच्या वस्तीजवळ काटवनातून अचानक बिबट्याने मोटारसायकलवर हल्ला केला. दोघांची भीतीने गाळण उडाली. ऋषिकेश मागे बसलेला होता. त्याच्या पायावर बिबट्याच्या पंजाने जखम झाली. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच याच भागात वडांगळी येथून काम आटोपून मेंढी येथे घराकडे जाणाऱ्या व्यक्तीवर बिबटयाने हल्ला केला होता. त्यामुळे या भागातून जाताना नागरिकांना जीव मुठीत धरुनच प्रवास करावा लागत आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, वनविभागाच्या वत्सला कांगणे, मधुकर शिंदे यांनी जखमींना भेट देत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.
एक बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश :
दरम्यान, मेंढी शिवारात गुरुवारी रात्री वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद झाला. यामुळे स्थानिक नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी मोटारसायकलस्वारांवर हल्ला झाल्याने दहशत मात्र कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून एक बिबट्या व त्याचे बछडे स्थानिक शेतकऱ्यांच्या निदर्शनास येत होते. दरम्यान, मेंढी वडांगळी रोडवरील सुधाकर कुंडलिक गिते यांच्या घरामागे वनविभागाने पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात एका बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.